रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा :मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:41 IST2018-11-23T20:40:32+5:302018-11-23T20:41:59+5:30
केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात आधुनिक, शाश्वत व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृद्धी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशातील विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा :मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात आधुनिक, शाश्वत व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृद्धी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशातील विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकात पाटील, गोव्याचे रामकृष्ण ढवळीकर, कर्नाटकचे एच. डी. रेवण्णा, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र्र शासन देशभरात रस्ते बांधणीला प्राधान्य देत आहे. रस्ते हे विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राज्यातील रस्तेबांधणीवर भर द्यावा. तसेच केंद्र शासनाला निधीसाठी सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्ते बांधकामातील भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची माहिती दिली. तसेच जानेवारीमध्ये महाराष्ट्रात रस्ते बांधकामातील रस्ते सुरक्षा आणि घ्यायची काळजी याबाबत माहिती दिली.
प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्त्यांचे जीवनमान वाढविणार : नितीन गडकरी
प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील रस्त्यांचे जीवनमान वाढविण्यावर केंद्र शासनाचा भर आहे. त्यामुळे जगातील नवनवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरातून हे शक्य होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
गोव्यात सर्व्हिस रोडचेही सिमेंटीकरण आवश्यक : रामकृष्ण ढवळीकर
गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनीसांगितले की, गोव्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यांसोबतच सर्व्हिस रोडचेही सिमेंट काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. यावेळी कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी कर्नाटकातील रस्त्यांबाबतची स्थिती आणि रस्ते बांधणीच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यात मुख्य रस्ते आणि त्याचे सर्व्हिस रोड यांच्या बांधकामातील रुंदी तसेच त्याबाबतचे निकषांबाबत चर्चा केली.