शुक्रवारपासून महावितरणची राज्य नाट्यस्पर्धा नागपुरात
By आनंद डेकाटे | Updated: July 11, 2024 15:56 IST2024-07-11T15:54:48+5:302024-07-11T15:56:03+5:30
Nagpur : १२ व १३ जुलै रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे होणार नाट्यस्पर्धा

State drama competition of Mahavitran in Nagpur from Friday
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा १२ व १३ जुलै रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे होत आहे. या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत महावितरणच्या पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोकण आणि नागपूर येथील प्रादेशिक विभागातर्फ़े नाटक सादरीकरण होणार आहे.
या नाट्यस्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी आणि संचालक (वित्त) अनुदिप दिघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सकाळी १० वाजता पुणे प्रादेशिक संघातर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘ती फ़ुलराणी’, तर दुपारी २.३० वाजता छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक संघातर्फ़े डॉ. गणेश शिंदे लिखित ‘उत्तरदायित्व’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कोकण प्रादेशिक संघातर्फ़े सुरेश जयराम लिखित ‘डबल गेम”’ तर नागपूर प्रादेशिक संघातर्फ़े दुपारी २.३० वाजता प्रकाश दाणी लिखित ‘नथिंग टु से’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण १३ जुलै रोजी सांयकाळी ५.३० वाजता करण्यात येईल.