‘सीएसआयआर’च्या सर्व संस्थांत अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:06+5:302020-12-09T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘सीएसआयआर’च्या सर्व संस्था त्यांच्या परिसरात विकसित ‘फायटोरिड’ तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थापन करतील, ...

‘सीएसआयआर’च्या सर्व संस्थांत अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीएसआयआर’च्या सर्व संस्था त्यांच्या परिसरात विकसित ‘फायटोरिड’ तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थापन करतील, अशी माहिती ‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ.शेखर मांडे यांनी दिली. ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे ‘आयआयएसएफ-२०२०’च्या (इंडिनय इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल) च्या ‘कर्टन रेझर’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्रालय, विज्ञान भारती आणि ‘सीएसआयआर-राष्ट्रीय विज्ञान,तंत्रज्ञान आणि विकास अध्ययन संस्था’ यांच्या सहकार्याने ६ डिसेंबर रोजी हे आयोजन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय विज्ञान भारतीचे सचिव जयंत सहस्रबुद्धे, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, माजी संचालक डॉ.सतीश वटे, सुधा तिवारी व डॉ. अत्या कपले प्रामुख्याने उपस्थित होते. विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भारताची निर्यात वाढविण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे नितीन गडकरी म्हणाले. ‘कोरोना’ महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, संशोधन कार्यात ‘सीएसआयआर’ने पूर्ण सहकार्य केले, असेदेखील त्यांनी सांगितले.
विज्ञान व समाजाला जोडणारा मंच अशी ‘आयआयएसएफ’ची ओळख आहे, असे जयंत सहस्रबुद्धे यांनी सांगितले. प्रत्येकाने ‘आयआयएसएफ’शी जुळले पाहिजे असे आवाहन डॉ.राकेश कुमार यांनी केले. यादरम्यान ‘आयआयएसएफ-२०२०’च्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. सोबतच स्मृतिवन येथे ‘सीएसआयआर-नीरी’च्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या प्रदर्शनाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. डॉ.अत्या कपले यांनी संचालन केले तर डॉ.सुकदेव पाल यांनी आभार मानले.