लसीकरणाला वाहन चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:31+5:302021-04-09T04:08:31+5:30
टाेचाल तर वाचाल नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी शासनाद्वारे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने ...

लसीकरणाला वाहन चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ()
टाेचाल तर वाचाल
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी शासनाद्वारे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका आणि लाेकमत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाच्या ‘विशेष घटक-विशिष्ट दिवस’ मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी सर्व वाहनचालकांचे लसीकरण करून माेहिमेला सुरुवात झाली. विविध केंद्रावर सर्व वाहनांच्या चालकांचा लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विविध शासकीय लसीकरण केंद्रावर ऑटाेचालक, टॅक्सीचालक, सायकल रिक्षाचालक, ई-रिक्षाचालक, काळी-पिवळी टॅक्सीचालक, ओला-उबर टॅक्सीचालक व खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी सहभाग घेतला. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील वाहनचालकांचे शासनाच्या नियमाप्रमाणे लसीकरण करण्यात आले. यामुळे शहरातील सर्व वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून, याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. विदर्भ ऑटोरिक्षा चालक संघटना कृती समितीचे अध्यक्ष विलास भालेराव यांनी मनपा व लाेकमत यांच्यावतीने शहरातील चालकांसाठी राबविण्यात आलेल्या माेहिमेची प्रशंसा केली. यापुढेही विविध क्षेत्रातील समाजघटकांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार केवळ ४५ वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हा आहे, असे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले. ठरलेल्या दिवशी लसीकरणास येणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
दर बुधवारी महिलांना लसीकरण
समाजात महिलांची टक्केवारी ५० टक्के आहे. त्यांनासुद्धा लसीकरण करणे गरजेचे आहे. मनपाद्वारे प्रत्येक बुधवारी ४५ वर्ष वयाेगटावरील महिलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरणाची विशेष व्यवस्था केली जाईल.
असे राहील लसीकरण (केवळ ४५ वर्ष वयाेगटावरीलच)
१२ एप्रिल - डिलिव्हरी व कुरियर बॉय
१४ एप्रिल - भाजीपाला, फळे व दूध विक्रेते
१६ एप्रिल - कामगार, हेल्पर व हाॅकर्स
१८ एप्रिल - मीडिया कर्मचारी, पत्रकार
२० एप्रिल - व्यापारी व मेडिकल दुकानदार
२२ एप्रिल - रेस्टाॅरंट, हॉटेल्स कर्मचारी
२४ एप्रिल - सेल्स व मार्केटिंग कर्मचारी