अध्यात्मिक; श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:42 PM2020-09-10T16:42:22+5:302020-09-10T16:43:24+5:30

पूर्वजन्म, पूर्वजन्मातील कर्म केवळ आपणच केलेली नाहीत तर घराण्यातील इतर कोणत्याही पूर्वजांकडून झालेल्या पाप कर्म व पुण्य कर्म कसे भोगावे लागते हे श्रीपाद स्वामींनी ह्या ग्रंथात सांगितलेय.

Spiritual; Shripad Srivallabha Charitramrit Mahatmya | अध्यात्मिक; श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महात्म्य

अध्यात्मिक; श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महात्म्य

googlenewsNext


नागपूर:
आपणां सर्वांना श्रीपाद श्रीवल्लभ श्रीदत्तात्रेयांचे कलियुगातील प्रथम अवतार झाले ते माहितीच आहे अशा श्रीपाद स्वामींच्या चरित्रातील फार थोडा भाग श्री गुरुचरित्रात आला आहे पण त्यांचे संपूर्ण चरित्र त्यांचे समकालीन असलेले श्री शंकर भट्ट यांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी संस्कृत मध्ये लिहिले होते तेव्हाच त्याचे तेलगु भाषांतर झाले होते पण हा ग्रंथ श्री श्रीपाद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे आजोबा श्री बापन्नाचार्युलु यांच्या 33 व्या पिढीत उदयास आला.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे मराठी साधक भक्तांसाठी सिद्धयोगाचार्य, भागवताचार्य ,परमपूज्य . श्री हरिभाऊ निटूरकर जोशी (भाऊ महाराज) यांनी श्रीपाद स्वामीच्या कृपाशिवार्दाने हा अनुवाद केला. अशा ह्या दिव्य, अद्भुत, अक्षरसत्य ग्रंथातील प्रत्येक अक्षराचे सामर्थ्य पेलून आपणासाठी सहज सोप्या शब्दात लिहून ठेवणे हे परम पूज्य श्री हरिभाऊ निटूरकर महाराजांच्या या साधनेचे तप:सामर्थ्य आहे हे अंतर्निहितच आहे. स्वामींचा जन्म चित्रा नक्षत्रावर मंगळवारी सिंह लग्नात भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीला ज्योती रूपाने झाला. याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते अनंत संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंदघन होते. वास्तवात श्रीपाद स्वामी त्रिमूर्तीचे संयुक्त स्वरूपात नसून त्रिमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्त्व आहे हे सुचविण्यासाठी त्यांनी गणेश चतुर्थीला अवतार घेतला. त्यांच्या चित्रा या जन्म नक्षत्रावर त्यांचे पूजन केल्यास ते विशेष फलप्रद असते. दत्त नामस्मरणाने सकल देवतांचे स्मरण केल्याचे फळ मिळते .श्रीपाद प्रभुना भक्तांची दु:ख पहावत नाहीत म्हणून त्यांनी या ग्रंथात सांगितले जो अनन्यभावाने शरण आला व श्री गुरु शरणम् दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाने स्वामींना अंतर्मनाने हाक मारेल त्याचे स्वामी रक्षण करतील.

या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य भरून आहे तेथून भक्तांना शुभ स्पंदनांची प्राप्ती होते त्यामुळे भक्तांचे प्रारब्ध क्षीण होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते.
प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा विचार कधीतरी येतोच, माझ्याच नशिबात हे दु:ख का? या प्रश्नाचे उत्तर केवळ ह्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केल्यास मिळते. पूर्वजन्म, पूर्वजन्मातील कर्म केवळ आपणच केलेली नाहीत तर घराण्यातील इतर कोणत्याही पूर्वजांकडून झालेल्या पाप कर्म व पुण्य कर्म कसे भोगावे लागते हे श्रीपाद स्वामींनी ह्या ग्रंथात सांगितलेय. कर्माची व्याप्ती केव्हा सुरू झाली व त्याचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे ह्या ग्रंथातून कळते. सातशे वर्षांपूर्वी या ग्रंथात पुढे होणाऱ्या घटना लिहून ठेवल्या आहेत. जसे रामदास स्वामी कोण, गजानन महाराज, शेगाव., शिवाजी महाराज, गाडगे महाराज, शिर्डीचे साईबाबा व अशी अनेक खूप माहिती यात दिली आहे. तसेच श्रीपादांचे पुढील श्रीनृसिंह सरस्वती अवतार, श्री अक्कलकोट स्वामी यांचा अवतार व कार्याची सांगता हे सर्व तिथी नक्षत्रासह ह्या ग्रंथात सांगितले आहेत .

वैज्ञानिक दृष्ट्या हा ग्रंथ परिपूर्ण आहे. कणाद महर्षींच्या कणसिद्धांत, सूक्ष्म परमाणुंमध्ये परिवर्तन होवून सृष्टीची निर्मिती, ब्रम्हांड कसे तयार झाले खगोलशास्त्रीय विचार या ग्रंथात सविस्तर मांडले आहे. खंड म्हणजे काय? द्वीप म्हणजे काय? ग्रह नक्षत्र यांची माहिती आहे. आपण जे अन्न सेवन करतो त्यामुळे शरीराबरोबर मनही तयार होत असते. अयोग्य व्यक्तीला अन्नदान केल्यास होणारा त्रास व योग्य व्यक्तीस अन्नदान केल्याचे फायदे या ग्रंथात आहेत.
संसारिक अडचणींनी त्रस्त मनुष्य अनेक ज्योतिषांकडे जावून ग्रह नक्षत्र दशा बघून तो अनेक प्रयत्न करतो या परिस्थितीत काय उपाय करावे ते स्वत: श्रीपाद स्वामींनी सांगितले. भक्तांनी कालसर्प योग व साडेसातीची भीती न बाळगता त्यातून सहज कसे बाहेर पडता येईल तेसुद्धा हा ग्रंथ सांगतो.

दत्ततत्त्वात शिवतत्त्व कसे सामावले आहे, शिवभक्तांना शिवमहिमा, रुद्राक्ष महिमा तसे शिवपूजा कशी करावी, त्याचे महत्त्व व अर्थ व फायदे, शनिप्रदोष महात्म केवळ या ग्रंथात वाचायला मिळते. यात शिवमहत्म्याशिवाय नवनाथ महात्म्य, दशमहाविद्यांबद्दलची संपूर्ण माहिती, अनेक शक्ती देवता व शक्तीपीठे यांचेही वर्णन आहे.
भगवान दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय असलेले औदुंबर वृक्षाचे तसेच अत्यंत पवित्र सर्व शक्ती संपन्न असलेल्या गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षराचा अर्थ सामर्थ्य यांची नव्याने माहिती हा ग्रंथ देतो. मुमुक्षु साधकांसाठी हा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे. जसजशी भक्ताची प्रगती होत जाते तसे ग्रंथातील अध्यात्मिक गुपितही साधकाला प्राप्त होतात. आत्मसाक्षात्कार, मोक्षाचा मिळवण्याचा सहज सोपा मार्ग श्रीपाद स्वामींनी सांगितला आहे. सायुज्य, सालोक्य, सामीप्य, स्वारुप्य ह्या मुक्तींची माहिती, साधक व अवतारी पुरुष, सद्गुरु यांच्यातील भेद, साधकांच्या सात अवस्था यांचे वर्णन आहे.

प्रत्येक साधकाच्या मनातील प्रश्न, शंका व अडचणी व त्यांना दिलेल्या समर्पक उत्तरांचा संवाद ह्यात आहे.
गुरुचरित्रातील घेवड्याच्या वेलाची गोष्ट किंवा साईबाबांच्या येथील कडुलिंबाच्या झाडाखाली चार नंदादीप यांची गोष्ट याचा पूर्वजन्मातील संबंध या ग्रंथात उलगडतो. कुंडलिनी शक्ती व शक्तीपात दिक्षा (ही शक्तिपात दिक्षा प.पू.श्री हरिभाऊ निटूरकर महाराज देतात) जागृतीने येणारे साधनेतील दिव्य अनुभव.
श्रीपाद स्वामीनी आपले कार्य श्रीक्षेत्र कुरवपूर येथे सुद्धा केले आहे, त्या क्षेत्राचे वर्णन आदिशेषालासुद्धा करणे शक्य नाही. कार्य करून स्वामींनी सर्व साधकांना मंगलमय आशीर्वाद देऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले तरीसुद्धा आजही ते चिरंजीव असून सर्व साधकांनी स्मरण करताच साधकांनकडे धावत येतात व साधकांच्या धर्मबद्ध इच्छा पूर्ण करतात. हा ग्रंथ वाचल्यावर हा अनुभव आल्यावाचून राहत नाही. त्यांनी स्वत: सांगितले आहे की हा ग्रंथ तुमच्या पूजा मंदिरात नुसता माहिती म्हणून ठेवला तरी त्यातून शुभ स्पंदने निघतील.

या ग्रंथ वाचनाने सर्वांना आनंदाची, समाधानाची प्राप्ती होते एवढा हा ज्ञानाने परिपूर्ण असा असूनसुद्धा समजण्यास अजिबात क्लिष्ट वाटत नाही. हा ग्रंथ कोणीही कोठेही व केव्हाही वाचू शकतो. ह्याच्या वाचनाला स्त्री-पुरुष असा भेद नाही. आंतरिक व बाह्य शुचिता पळून या ग्रंथाचे पठण केले तरी चालते. जेथे या ग्रंथाचे पारायण व श्री दत्तात्रयांचे नामस्मरण होत राहील तेथे हे श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने नेहमी वास्तव्य करतात. या ग्रंथात त्यांनी भक्तांना दिलेली बारा अभय वचने आहेत. सिद्धमंगल स्तोत्र श्री बापन्नाचार्युलु यांनी लिहिलेले आहे तसेच श्रीदत्त अनघालक्ष्मी व्रत (ह्या व्रताची तसेच प्रदोष व्रताची पूजा सहज सोप्यापण शास्रोक्त कशी करायची याची पोथी श्री भाऊ महाराजांनी सर्वांसाठी उपलब्ध करुन दिलीय) आजही हजारो लोक त्याचे पारायण करून आनंदाचा अनुभव घेत आहेत.

या ग्रंथाच्या वाचनाने साधकांना खूप अनुभव येतात पारायण करणाऱ्या व्यक्तीला दत्त क्षेत्रातून प्रसाद प्राप्त होतो. कित्येक मुला-मुलींचे विवाह जमतात. अनेक शारीरिक व्याधी यांचे कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाचे सुद्धा निवारण झाले आहे.
नोकरी लागणे, घरात शांती राहणे ,निपुत्रिकेला पुत्र होणे अशा आणि अनेक अडचणींवर कलियुगातील मानव त्रस्त असताना श्री भाऊ महाराजांच्या अपार कृपेने आपणास हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाची माहिती मिळाली. तो अवश्य वाचनात ठेवावा व आनंदाची प्राप्ती करून घ्यावी.ह्या ग्रंथाचे श्री भाऊ महाराजांनी संक्षिप्त मराठी चरित्रामृत,हिंदी मोठे व संक्षिप्त चरित्रामृत तसेच इंग्रजी संक्षिप्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सुद्धा केले आहे.

सौ. मंजुषा अजित बाब्रेकर

Web Title: Spiritual; Shripad Srivallabha Charitramrit Mahatmya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.