अखर्चित निधी खर्च करा, नंतरच नवीन निधी

By Admin | Updated: May 6, 2017 02:45 IST2017-05-06T02:45:28+5:302017-05-06T02:45:28+5:30

जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यांनी शासनाने दिलेला निधी व बकाया अखर्चित निधी यांचा हिशेब द्यावा.

Spend the entire amount, then the new fund | अखर्चित निधी खर्च करा, नंतरच नवीन निधी

अखर्चित निधी खर्च करा, नंतरच नवीन निधी

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : विकास कामांचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यांनी शासनाने दिलेला निधी व बकाया अखर्चित निधी यांचा हिशेब द्यावा. तसेच अखर्चित निधी खर्च केल्याशिवाय नवीन निधी शासनाकडून मिळणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना बजावले.
रविभवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी विविध २८ मुद्यांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. शासकीय स्तरावर नागपूर जिल्ह्यातील न.प. व न.पं क्षेत्रातील प्रस्तावित कामे मंजूर करण्याकरिता संबंधित विभागाशी बैठका घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत दलित वस्ती, विकास आराखडा, प्राथमिक शाळा इमारत व शिक्षक समायोजनाची सद्यस्थिती, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते अनुदान, सांडपाणी प्रक्रिया, पाणी पुरवठा योजना, तीर्थक्षेत्र विकास निधी, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार योजना अंमलबजावणी, रोजगार हमी योजनाची कामे, घरकुल योजना, भूमिगत गटारे, वीज केबल, कनेक्शन, आणि १४ वे वित्त आयोग या सर्व योजनांच्या कार्यान्वित कामांचा संख्यात्मक आढावा घेण्यात आला. पालकमंत्री बावनकुळे यांनी सर्व न.पा. व न.पं. मध्ये प्रत्येक संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्याकरिता तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. कन्हान नगर परिषद येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता २३ कोटीचे अनुदान लवकरच मंजूर करण्यात येईल. पाणी पुरवठा मंत्र्यांकडे कळमेश्वर, उमरेड, खापा, काटोल, भिवापूर, पारशिवनी येथील पाणी पुरवठा योजनासंबंधी बैठका आयोजित करून तात्काळ मंजुरी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. नगरविकास मंत्रालयात कळमेश्वर नगर परिषदेचा आराखडा व कळमेश्वर-ब्राम्हणी एकत्रीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी, खापा येथील लष्करशाह दर्गा या तीर्थक्षेत्राला ३.५ कोटी प्रस्तावास मंजुरी, काटोल व मोवाड नगर परिषदमधील प्रस्तावित विकास आराखड्यातील आरक्षित जमिनी खरेदी करण्याकरिता शासन स्तरावर निधी प्राप्त करण्याकरिता बैठकांचे आयोजन करण्यात येईल. मुख्यमंत्री कार्यालयात सावनेर नगर परिषद येथील लहान आणि मध्यम शहराच्या नागरी पायाभूत सुविधा विकास योजना अंतर्गत अप्राप्त १७ कोटीचा निधी मिळविण्याकरिता रामटेक नगर परिषद येथील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेकरिता २.५ कोटी निधी मंजुरीकरिता बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
या आढावा बैठकीत आ. सुधीर पारवे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. आशिष देशमुख, आ. गिरीश व्यास, आ. प्रकाश गजभिये, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, प्रेम झाडे, अरविंद गजभिये, किशोर रेवतकर, संजय टेकाडे, अशोक धोटे, टेकचंद सावरकर आदी उपस्थित होते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यावर नाराजी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली. अंबाझरी तलाव व अन्य तलावांमध्ये काही कारखान्यांचे सांडपाणी जात असल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकारी यांच्या बाबतीत गंभीर दखल घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Spend the entire amount, then the new fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.