उमरेड मार्गावर भीषण अपघात; भरधाव कार ट्रकवर आदळून सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 01:06 IST2022-05-06T23:49:34+5:302022-05-07T01:06:13+5:30
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना कारची ट्रकला जोरदार धडक; कारच्या पुढील भागाचा चक्काचूर

उमरेड मार्गावर भीषण अपघात; भरधाव कार ट्रकवर आदळून सात जणांचा मृत्यू
नागपूर: उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ भरधाव तवेरा ट्रकवर आदळली. त्यामुळे भीषण अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास राम कुलर कंपनीजवळ हा भीषण अपघात झाला.
एमएच ४९/ ४३१५ क्रमांकाच्या तवेरा कारमध्ये बसून नागपुरातील एका महिलेसह सात जण उमरेड मार्गाने जात होते. समोर एक ट्रक होता. तवेराचा वेग मर्यादित वेगापेक्षा जास्त होता. अशात चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे तवेराचा समोरचा भाग पुरता चक्काचूर होऊन आतमधील सात जण ठार झाले. तर एक बालिका गंभीर जखमी झाली. रस्त्याने जाणाऱ्यांनी बऱ्याच वेळेनंतर ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर उमरेड पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मात्र, अपघाताचे स्थळ नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येत असल्याने त्यांनी ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळविली. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत जखमी बालिकेला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अपघात कसा झाला त्याबद्दलची चौकशी सुरू केली. मात्र तोपर्यंत प्रत्यक्षदर्शी निघून गेल्याने नेमका अपघात कसा झाला त्याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान, या भीषण अपघातात चे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त नुरुल हसन, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्यासह शहर पोलिसांचा ताफा अपघातस्थळी पोहोचला. त्यांनी अपघात स्थळावरची वाहन रस्त्याच्या बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. जखमी बालिकेकडून अपघाताबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध न झाल्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही पोलिसांकडून अपघातातील मृत अथवा जखमींची नावे स्पष्ट करण्यास असमर्थता दर्शविली गेली.