दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
By नरेश डोंगरे | Updated: October 26, 2025 21:19 IST2025-10-26T21:19:35+5:302025-10-26T21:19:51+5:30
Central Railway: यंदाच्या दिवाळीच्या पर्वाचा समारोप होत असला तरी छठपूजेचा उत्सव असल्याने विविध प्रांतातील रहिवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ती ध्यानात घेत मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध स्थानकावरून सोमवारी २८ ऑक्टोबरला एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
- नरेश डोंगरे
नागपूर - यंदाच्या दिवाळीच्या पर्वाचा समारोप होत असला तरी छठपूजेचा उत्सव असल्याने विविध प्रांतातील रहिवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ती ध्यानात घेत मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध स्थानकावरून सोमवारी २८ ऑक्टोबरला एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीचा सण आटोपून आपापल्या गावाला, रोजगाराच्या ठिकाणी परतणाऱ्यांची विविध गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी होत आहे. त्यात छठपूजेला निघालेल्या भाविकांचीही त्यात भर पडत आहे. परिणामी जवळपास प्रत्येक रेल्वे गाडीत, रेल्वे स्थानकावर पाय ठेवायला जागा दिसत नाही. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेकांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. खास करून ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि मुलांना या गर्दीत प्रवास करताना मोठा त्रास होत आहे. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महाराष्ट्रात सोमवारी विविध मार्गावर २३ स्पेशल ट्रेन चालविण्याचे जाहीर केले आहे. त्यात नागपूरहून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या तसेच तिकडून येणाऱ्या चार स्पेशल ट्रेनचाही समावेश आहे.
नागपूरहून सुटणाऱ्या गाड्या
या मालिकेतील ट्रेन नंबर ०१४१० नागपूर-पुणे विशेष ट्रेन सोमवारी २८ ऑक्टोबरला नागपूर स्थानकावरून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाइन या स्थानकावर थांबणार आहे. गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, अकरा शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
अशाच प्रकारे ट्रेन नंबर ०१०१२ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल ट्रेन सोमवारी रात्री १०:१० वाजता नागपूर स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर स्थानकावर थांबणार आहे. गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, बारा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
नागपूरला येणाऱ्या गाड्या
ट्रेन नंबर ०१४०१ पुणे-नागपूर स्पेशल पुणे स्थानकावरून सोमवारी रात्री ८:३० वाजता नागपूरकडे निघेल. मार्गातील दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर ही गाडी थांबेल. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, तेरा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
अशाच प्रकारे ट्रेन नंबर ०१२०२ हडपसर नागपूर ही स्पेशल गाडी हडपसर स्थानकावरून सोमवारी दुपारी ३:५० वाजता नागपूरकडे निघणार आहे. ही गाडी ऊरळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबेल. गाडीला चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.