विशेष मोहीम : नागपुरात ७ दिवसात ६१७ गुन्हेगारांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:01 IST2020-06-13T20:59:01+5:302020-06-13T21:01:08+5:30
गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी नागपुरात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गेल्या सात दिवसात पोलिसांनी तब्बल साडेपाच हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यातील ६१७ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यांना कोठडीत डांबण्यात आले आहे.

विशेष मोहीम : नागपुरात ७ दिवसात ६१७ गुन्हेगारांविरुद्ध कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी नागपुरात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गेल्या सात दिवसात पोलिसांनी तब्बल साडेपाच हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यातील ६१७ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यांना कोठडीत डांबण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसात नागपुरातील गुन्हेगार पुन्हा डोके वर काढू लागल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्यांची नांगी ठेचण्यासाठी शहरातऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार ५ जूनपासून उपराजधानीत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. ५ ते १२ जून या सात दिवसात पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, मारामारी करणारे गुन्हेगार तसेच कारागृहातून जामिनावर सुटलेले आणि तीनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून तपासणी केली. एकूण ५ हजार, ६५१ गुन्हेगारांना तपासण्यात आले. त्यात ५७५ अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, खून खुनाचा प्रयत्न दुखापत दंगा हाणामारी अशा २६०५ गुन्हेगारांना तपासण्यात आले. नुकतेच कारागृहातून सुटलेले आणि तीनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या २३६१ गुन्हेगारांना तपासण्यात आले. त्याचप्रमाणे शस्त्र बाळगणाऱ्या६९, दरोड्याच्या तयारीत असलेल्या १६, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या २१, सीआरपीसीचे गुन्हे दाखल असलेल्या १२७ तसेच अन्य गुन्हेगार पकडून एकूण ६१७ कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले.
दारू आणि जुगार अड्ड्यावरही कारवाई
ठिकठिकाणी अवैध दारू विक्री करणारे आणि जुगार अड्ड्यावरही पोलिसांकडून छापे मारण्यात आले. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्तालयातून कळविण्यात आले आहे.