विशेष कोम्बिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:17+5:302021-01-02T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप देण्याची तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. यात ...

विशेष कोम्बिंग ऑपरेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप देण्याची तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. यात गुन्हेगारांची खोडा करून अस्वस्थता निर्माण करू नये म्हणून पोलिसांनी ३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान तीन तासांचे विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात सराईत गुन्हेगारांसह एकूण ६६० गुन्हेगारांची चौकशी आणि धरपकड करण्यात आली.
बुधवारी रात्री ११ वाजतापासून तो गुरुवारी पहाटे २ वाजेपर्यंत चाललेल्या या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान शहरातील ६६० गुन्हेगारांना तपासण्यात आले. वारंवार गुन्हे करणारे १३९ हिस्ट्रीशिटर तसेच ९४ तडीपार गुन्हेगारही तपासण्यात आले. ७४ हॉटेल, लॉज, ढाबे आणि बार तपासण्यात आले. ४५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या कलमांनुसार ४२ जणांवर कारवाई करण्यात आली. हत्यार कायद्यानुसार १२, दारूबंदीचे २१ गुन्हे दाखल करण्यात आले. तर, १७ लोकांना वॉरंट आणि समन्स बजावण्यात आले. वेगवेगळ्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका गुन्हेगारासह चाैघांना अटक करण्यात आली. तर, एक वाहनही जप्त करण्यात आले.
---
मांजा विक्रेत्यावर कडक कारवाई होणार
बुधवारी झिंगाबाई टाकळी परिसरात आदित्य संतोष भारद्वाज (वय १७) याचा गळा कापला गेला तर पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या वंश विकास तिरपुडे या सात वर्षीय चिमुकल्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. पुन्हा असे काही होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पतंगबाज आणि मांजाविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे मांजा आणि पतंग विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.
---