मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम
By Admin | Updated: June 22, 2014 00:55 IST2014-06-22T00:55:27+5:302014-06-22T00:55:27+5:30
मतदारांची नोंदणी करण्यासाठी नव्याने विशेष मोहीम शनिवारपासून सुरू झाली असून, ती रविवारी आणि २८ व २९ जून रोजी राबविण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम
२२, २८ व २९ रोजी करा नोंदणी : तहसील व झोनमध्ये केंद्र
नागपूर : मतदारांची नोंदणी करण्यासाठी नव्याने विशेष मोहीम शनिवारपासून सुरू झाली असून, ती रविवारी आणि २८ व २९ जून रोजी राबविण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करताना जिल्हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील एकूण साडेपाच लाख मतदारांची नावे वगळली होती. मतदानाच्या दिवशी यादीत नाव न दिसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला होता. या नाराजीची दखल न्यायालयानेही घेतली. वगळण्यात आलेल्या मतदारांसोबतच इतरही मतदारांसाठी आयोगाने विशेष मोहीम घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नागपुरात शनिवारी २१ जूनपासून मोहीम सुरू करण्यात आली. रविवारी २२ जूनला तसेच २८ आणि २९ जून रोजी ही मोहीम सुरू राहणार आहे. ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचे मतदान केंद्र होते त्या सर्व ठिकाणी मतदार नोंदणी करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रासाठी मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे निवडणूक शाखेच्यावतीने कळविण्यात आले आहे. तहसील कार्यालय तसेच महापालिकेच्या प्रत्येक झोन कार्यालयात मतदार मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. नाव नोंदणी केल्यानंतर यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावेळी नोंदणी करणाऱ्या मतदारांनी त्यांचे नाव यादीत आहे किंवा नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेने केले आहे. (प्रतिनिधी)