एकमुखाने बोला...बोला जयजय हनुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:25 IST2019-04-20T00:20:49+5:302019-04-20T00:25:08+5:30
भगवान शंकराचा ११ वा अवतार, प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीसारखाच उत्साह हनुमान जयंतीलाही शहरांमध्ये बघायला मिळाला. जय श्रीराम, जय हनुमानाचा गजर सर्वत्र झाला. जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन, सुंदरकांड पाठ, आरती, प्रसादाचे वितरण करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध मंदिरांमधून शोभायात्रासुद्धा काढण्यात आली.

एकमुखाने बोला...बोला जयजय हनुमान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान शंकराचा ११ वा अवतार, प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीसारखाच उत्साह हनुमान जयंतीलाही शहरांमध्ये बघायला मिळाला. जय श्रीराम, जय हनुमानाचा गजर सर्वत्र झाला. जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन, सुंदरकांड पाठ, आरती, प्रसादाचे वितरण करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध मंदिरांमधून शोभायात्रासुद्धा काढण्यात आली.
राजाबाक्षा हनुमान मंदिरातून निघाली शोभायात्रा
मेडिकल चौक येथील राजाबाक्षा हनुमान मंदिरातून सायंकळी शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर चांदीच्या प्रतिमेला रथावर विराजमान करून, रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, आचार्य विवेक तिवारी उपस्थित होते. मुख्य रथाच्या मागे ५० हून अधिक चित्ररथांचा समावेश होता. १२ किमी.चा प्रवास करून शोभायात्रा पुन्हा मंदिरात पोहचली. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभूषेत लहानगे सहभागी झाले होते. अभिषेक तिवारी, हर्षद कुंडे, तेजस कुमरे, मयूर कर्णिक, आशिष लंगोटे, श्रेयस कुमरे, सुभाष शर्मा, विजय पुरोहित, वेदांत तिवारी, शिशिर गुजर आदींचे सहकार्य लाभले.
कीर्तनानंतर अभिषेक
शोभायात्रेपूर्वी मंदिरात पहाटे ४ वाजता कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर विविध भजन मंडळांतर्फे भजनांचे सादरीकरण झाले. मंदिरात पहाटेपासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.