आशा भोसलेंच्या स्वरांनी नागपूर महोत्सवाचा श्रीगणेशा
By Admin | Updated: January 18, 2015 00:57 IST2015-01-18T00:57:11+5:302015-01-18T00:57:11+5:30
शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक विकासाला चालना मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे २२ ते २६ जानेवारीदरम्यान यशवंत स्टेडियम ‘येथे नागपूर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

आशा भोसलेंच्या स्वरांनी नागपूर महोत्सवाचा श्रीगणेशा
गायन, फ्यूजन अन् कविसंमेलनाची धूम : २२ जानेवारीला उद्घाटन
नागपूर : शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक विकासाला चालना मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे २२ ते २६ जानेवारीदरम्यान यशवंत स्टेडियम ‘येथे नागपूर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या सुमधूर स्वरांनी या सोहळ्याचा श्रीगणेशा होईल. महोत्सवात गायन, फ्यूजन अन् कवि संमेलनाची पर्वनी नागपूरकरांना अनुभवायला मिळेल.
नागपूर महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी, स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार विजय दर्डा उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके असतील. समारोप २६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, जोगेंद्र कवाडे, प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये, माजी मंत्री राजेंद्र मुळक, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे आदी उपस्थित राहतील.
शहरातील सर्व नागरिकांना बघता यावा, यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील यशवंत स्टेडियम येथे या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षक व रसिकांची होणारी गर्दी विचारात घेता तारांबळ उडू नये यासाठी निमंत्रण पत्रिका असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अधिकारी, विविध वृत्तपत्रांचे संपादक तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सदिच्छा भेट देणार आहेत. या मान्यवरांसह नागपूर शहरातील संगीत, नाट्य, लोककला, लोकसंगीत, साहित्यिक व विविध सांस्कृतिक क्षेत्रात आलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला जाईल. पत्रकार परिषदेला शिक्षण सभापती चेतना टांक, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष हरीश दिकोंडवार ,अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सांस्कृ तिक वारसा जपण्याचा प्रयत्न
नागपूर महोत्सवाच्या माध्यमातून शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा व त्याला चालना देण्याचा मनपाने प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलावंतांचा सहभाग असल्याने त्यांना प्रोत्साहन मिळेल. शहरातील रसिक श्रोत्यांना या माध्यमातून एक मेजवानी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पाचवा महोत्सव
मागील पाच वर्षापासून मनपातर्फे नागपूर महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. आशा भोसले यांनी या कार्यक्र माला येण्याचे मान्य केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महत्त्वाची बाब असल्याचे आयोजकांनी सांगितले.