सफाई कामगार आर्थिक विकास महामंडळाचा लवकरच निर्णय
By Admin | Updated: September 16, 2015 03:38 IST2015-09-16T03:38:03+5:302015-09-16T03:38:03+5:30
सुदर्शन-वाल्मिकी- मखियार समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

सफाई कामगार आर्थिक विकास महामंडळाचा लवकरच निर्णय
मुख्यमंत्र्यांची ग्वाही : सुदर्शन-वाल्मिकी- मखियार समाजाचे विभागीय संमेलन
नागपूर : सुदर्शन-वाल्मिकी- मखियार समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या संदर्भात आॅक्टोबरमध्ये बैठक आयोजित करण्यात येईल. तसेच सफाई कामगार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा शासन स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
डॉ. बाबासाहेब सामाजिक विकास कें द्र व सुदर्शन-वाल्मिकी- मखियार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विदर्भ विभागीय सामाजिक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते रामूजी पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके व मनपातील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
लाड व पागे समितीने केलेल्या शिफारशी कायम राहाव्या, यासाठी न्यायालयात सरकारतर्फे बाजू मांडली जाईल. सुदर्शन-वाल्मिकी- मखियार समाजातील घटकांना सामाजिक सुरक्षा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पंतप्रधान मुद्रा बँकेच्या माध्यमातून समाजातील बेरोजगारांना व्यवसायासाठी १० लाखापर्यत कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
गेल्या २०-२५ वर्षात समाजाची परिस्थिती वाईट होत गेली. समस्यांवर तोडगा निघाला नाही. परंतु आता समाजाचा प्रत्येक प्रश्न मार्गी लावला जाईल. यासाठी थोडा वेळ लागेल. मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून कार्यक्र माला आलो आहे. संमेलनाच्या निमित्ताने समाजातील नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन प्रश्न सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी फडणवीस यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. समाजातील दहावी उत्तीर्ण, गोंदिया येथील स्वाती राजेश लद्रे या पायलट झालेल्या युवतीचा, एमबीए झालेल्या विद्यार्थ्याचा तसेच समाजातील ज्येष्ठांचा फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सुदर्शन समाजाकडे गत काळात सरकारने दुर्लक्ष केले. केंंद्र सरकारच्या भंगी मुक्ती कष्ट पुनर्वसन योजनेंर्गत आरक्षण देण्यात यावे. मनपातील सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. लाड व पागे समितीच्या शिफारशी अमलात आणाव्या. सफाई कर्मचाऱ्यांसाठी महर्षी सुदर्शन वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी रामूजी पवार यांनी अध्यक्षीय भाषणातून केली. या प्रसंगी समाजाच्यावतीने फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सुदर्शन जनपंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर महतो, भारतीय सुदर्शन समाजाचे अध्यक्ष गौरीशंकर ग्रॉवकर, सफाई मजदूर काँगे्रेसचे जयसिंग कछवाह, मनपा एम्प्लॉईज असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, अखिल भारतीय मखियार समाजाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल बघेल, कामगार नेते सुदाम महाजन, बाबुराव वामन, दिलीप हाथीबेड, विजय हारकर, प्रदीप महातो, सुनील तांबे, उमेश पिंपरे, सतीश सिरसवान, संजय शेन्द्रे सुनील तुर्केल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)