‘पोलीस कल्याण’साठी गाणार नेहा कक्कड : नागपुरात शनिवारी लाईव्ह इन कॉन्सर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 21:20 IST2019-08-08T21:17:38+5:302019-08-08T21:20:17+5:30
नागपूर शहर पोलिसांनी १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

‘पोलीस कल्याण’साठी गाणार नेहा कक्कड : नागपुरात शनिवारी लाईव्ह इन कॉन्सर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांनी सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे. १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमात सिने अभिनेत्री उर्वशी रौतेला, हास्य कलावंत अली असगर, वरुण शर्मा, ईशान खान आणि नताशा सुरी हेदेखील आपले सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस उपायुक्त विनिता साहू, उपायुक्त चिन्मय पंडित आणि उपायुक्त विक्रम साळी उपस्थित होते.
ऐनवेळी उद्भवलेल्या अडचणीत पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुरेसा निधी हाताशी असावा म्हणून ठिकठिकाणी पोलीस वेल्फेअर शो आयोजित करतात. नागपूर पोलिसांकडून तब्बल सात वर्षांनंतर अशा प्रकारचा शो ‘सूर संध्या’ चे आयोजन करण्यात येत आहे. या संबंधाने माहिती देताना अतिरिक्त आयुक्त महावरकर म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याची समस्या उद्भवली, त्याच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या रकमेची गरज भासली किंवा तशीच कोणती महत्त्वाची अडचण आल्यास पोलीस कल्याण निधीचा वापर केला जातो. शहर पोलीस कल्याण निधीत पाहिजे तशी गंगाजळी नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांकडून देणगी (डोनेशन) घेऊन त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या पासेस दिल्या जात आहे. अत्यंत शिस्तीत आणि आदर्श कार्यक्रम व्हावा, यासाठी शहर पोलीस दल प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाला येणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, वाहतुकीला अडसर निर्माण होऊ नये, याचीही पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले. कार्यक्रमाला येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना पोलीस मदत करणार आहेत. या कार्यक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांच्या सुविधांसाठी शहर पोलीस दल आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचे उपायुक्त विनिता साहू यांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी सहा हजार प्रेक्षक येतील, अशी अपेक्षा उपायुक्त विक्रम साळी यांनी व्यक्त केली.
प्रशस्त पार्किंग व्यवस्था
मोठ्या संख्येत प्रेक्षक येण्याची अपेक्षा असल्याने कार्यक्रमस्थळी चार प्रवेशद्वार तयार करण्यात आले असून त्यांना वेगवेगळ्या दारातून प्रवेश देण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी पार्किंगचीही प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे.