Some 'Relax' and some busy in 'Mathematics'!; A day of candidates | असा गेला उमेदवारांचा दिवस; काही झाले ‘रिलॅक्स’ तर काही ‘गणितात’ व्यस्त!

असा गेला उमेदवारांचा दिवस; काही झाले ‘रिलॅक्स’ तर काही ‘गणितात’ व्यस्त!

ठळक मुद्देआता चिंता अन् धाकधूक मतमोजणीची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीतील धावपळ अन् आलेला ‘स्ट्रेस’ दूर करण्यासाठी काही उमेदवारांनी ‘रिलॅक्स’ होणेच पसंत केले. तर अनेकांनी उद्यावरच असलेल्या मतमोजणीपूर्वी आपले ‘गणित’ कसे असेल, याचे आडाखे मांडण्यावर वेळ दिला. ज्यांना शाश्वती नाही, ते निश्चिंत दिसले. मतदानाची टक्केवारी घटली असल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर चिंता आणि धाकधूक मात्र होती. मंगळवारी मतदानानंतरचा दुसरा दिवस उजाडला. अनेकजण उशिराच उठले. नाश्ता, चहा घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांचा दरबार भरला. काही उमेदवार कार्यकर्त्यांना आणि मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदान न करता आलेल्यांना भेटून तक्रारी ऐकताना दिसले. एकदाचे मतदान पार पडले की एरवी उमेदवार निवांत होतात, कार्यकर्ते मोकळा श्वास घेतात आणि पक्ष कार्यालयेही लगबग सोडून आपल्या नेहमीच्या रूपात परत येतात. एकूणच मतदानाचा ‘फिव्हर’ ओसरतो. पण, लगेचच मतमोजणी असल्याने हा ‘फिव्हर’ अजूनही तसाच होता. उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक कुणालाच मतदानानंतरही निर्धास्त होता आले नसल्याचेच चित्र दुसºया दिवशी पाहायला मिळाले. काय करत होते उमेदवार...लोकमतने घेतलेला हा प्रत्यक्ष वेध...

निवडणुकीनंतरदेखील मुख्यमंत्री बैठकांत व्यस्त
मागील महिन्याभरापासून राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धूम सुरू होती. सोमवारी मतदान आटोपल्यानंतर अनेक उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला व निवांत दिवस घालविण्यावर भर दिला. मात्र राज्याचे मुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिम नागपूरचे भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मंगळवारचा दिवसदेखील धावपळीचाच ठरला. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील मतदानाचा आढावा घेतला. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याशिवाय नियोजित बैठकीदेखील घेतल्या. सकाळपासूनच मुख्यमंत्री व्यस्त होते. शिवाय ‘सोशल मीडिया’वर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या. सोमवारी मतदानानंतरदेखील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मतदानाकडे लक्ष ठेवले. शिवाय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सायंकाळच्या वेळी त्यांनी थोडा निवांत वेळ घालविला. जुन्या मित्रांची भेट घेतली व त्यांच्याशी गप्पा केल्या. सोबतच ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांची त्यांच्या ‘यवतमाळ हाऊस’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी अमृतादेखील होत्या. तेथे काही क्षण मुख्यमंत्री निवांत होते.

दिवसभर येणाऱ्या-जाणाऱ्यांची रेलचेल होती
पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने घेतलेली मेहनत, त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मला तणाव जाणवलाच नाही. काल मतदान पार पडले. रात्री सर्वांकडून आढावा घेतला. निवांत झोप घेतली. निवडणुकीच्या काळात सकाळपासूनच घराबाहेर पडावे लागत होते. आज मात्र उठल्यानंतर घरीच होतो. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार घरी भेटायला आले. दिवसभरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची रेलचेल सुरूच होती. येणारा प्रत्येक जण फिडबॅक देत होता. मीसुद्धा त्यांच्याकडून आढावा घेत होतो. कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरसुद्धा चर्चा केली. त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात आलेल्या प्रत्येकांसोबत निवडणूक, मतदान यावरच चर्चा झाली. गप्पागोष्टी होत होत्या. मतमोजणीच्या दिवशीचे नियोजन झाले. कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यातच संपूर्ण दिवस गेला.
सुधाकर देशमुख, भाजपा उमेदवार, पश्चिम नागपूर

बूथनिहाय घेतला आढावा
हा संपूर्ण महिनाच निवडणुकीच्या धावपळीत गेला. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या थकवा येतोच. काल मतदान होते. त्यामुळे रात्री झोपायलाही उशीरच झाला. आता मतदान संपले. त्यामुळे थोडा निवांत वेळमिळाला. परंतु पूर्णपणे रिलॅक्स झालो, असे म्हणता येणार नाही. काल माझ्या नात्यातील एकाचा मृत्यू झाला. आज अंत्यसंस्कार पार पडले. तिथे थोडा वेळ गेला. निवडणुकीच्या धावपळीमुळे थकवा आहेच. त्यामुळे दुपारच्या वेळी विश्रांती घेतली. सायंकाळी पुन्हा आपल्या कामाला लागलो. मतदार संघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. प्रत्येकाकडून बूथनिहाय आढावा घेतला. आपण कुठे पुढे राहिलो, कुठे मागे पडलो, यावर चर्चा झाली. त्यासोबतच माझ्यासोबत कित्येक कार्यकर्ते अनेक दिवस निवडणुकीच्या काळात दिवस-रात्र राबत आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. चर्चा केली. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपणही अनेक ठिकाणी फिरल्याने एकूणच चांगले मतदान झाल्याचे समाधान आहे. आपल्या बाजूने सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक दिवसानंतर कुटुंबासोबत मोकळ्यापणाने वेळ घालवता आला. आता प्रतीक्षा केवळ २४ तारखेची आहे.
डॉ. नितीन राऊत, काँग्रेस, उमेदवार उत्तर नागपूर

Web Title: Some 'Relax' and some busy in 'Mathematics'!; A day of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.