माती नाल्यात;पैसा पाण्यात
By Admin | Updated: June 20, 2016 02:30 IST2016-06-20T02:30:07+5:302016-06-20T02:30:07+5:30
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे उत्तर नागपुुरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

माती नाल्यात;पैसा पाण्यात
नागपूर : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे उत्तर नागपुुरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पिवळी नदी व नाल्याकाठावरील वस्त्यात पाणी शिरल्याने मोठी हानी झाली होती. शहरातील खोलगट भागातील वस्त्या व नदी-नाल्याकाठावरील वस्त्यांना दरवर्षीच्या पावसाळ्यात धोका निर्माण होतो.अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील तीन प्रमुख नद्या व २२६ नाले स्वच्छ करण्याचे अभियान हाती घेतले आहे. हजारो टन गाळ व कचरा जमा करण्यात आला. यातील काही ठिकाणचा गाळ दुसरीकडे नेण्यात आला. परंतु अद्याप ठिकठिकाणी नदी -नाल्याच्या काठावर व पात्रात जमा करण्यात आलेला गाळ तसाच साचून आहे. पुरासोबच हा गाळ पुन्हा नदीपात्रात जमा होणार असल्याने नदी स्वच्छता अभियानावरील केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
शहरातील नाग नदीची लांबी १८ किलोमीटर असून, पिवळी नदी १९ तर पोहरा नदीची लांबी १० किलोमीटर आहे. अशा एकूण ४७ किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातील तसेच २२६ नाल्यातील गाळ काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी स्वच्छता अभियान राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु गाळ व कचरा अनेक ठिकाणी तसाच पडून असल्याचे ‘लोकमत’ चमूच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आले. तीन प्रमुख नद्यातील गाळ व कचरा नदीपात्रात किनाऱ्यालगत अथवा काठावर जमा करण्यात आलेला आहे.काही ठिकाणचा गाळ दुसरीकडे नेण्यात आला. परंतु अनेक ठिकाणी अद्याप तो तसाच पडून आहे.
याही वर्षी मे महिन्यात मोठा गाजावाजा करून शहरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख तीन नद्या व सर्व नाल्यांची ५ जूनपर्यंत सफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. मात्र जून महिना अर्धाअधिक संपत आला असताना अद्याप नालेसफाईचे काम सुरूच आहे. १७ जूनला झालेल्या पहिल्याच पावसाने काठावर साचविलेला गाळ वाहूननदीपात्रात पुन्हा साचल्याचे दिसून आले.
शहराच्या मध्यभागी असलेल्या धंतोली पोलीस स्टेशनजवळ आणि मोक्षधाम घाटाजवळ मोठ्या प्रमाणात गाळ काठावर जमा करून ठेवला आहे. पुढे नंदनवन झोपडपट्टीपर्यंत कचरा नदीबाहेर काढण्यात आला नाही. भिंतीला लागूनच जमा करून ठेवला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक कचरा पहिल्याच पावसात पुन्हा नाल्याच्या प्रवाहाला लागला आहे. नागनदी काठावर असलेल्या सोनिया गांधीनगर, नंदनवन झोपडपट्टी व इतर वस्त्यांमध्ये मागील वर्षी पुराने थैमान घातले होते.
दरवषीं कोट्यवधीचा खर्च
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले स्वच्छ केले जातात २५ ते ३० लाखांचा खर्च करण्यात येतो. यावर्षी हा खर्च दुपटीवर गेला आहे. नद्या स्वच्छता अभियानावर ३० ते ४० दिवस महापालिकेचे कर्मचारी काम करतात. त्यांचे वेतन व स्वच्छता अभियानावरील खर्च असा हा आकडा कोटीच्या घरात जातो. थेट महापालिकेच्या तिजोरीतून हा पैसा खर्च होत नसल्याचा दावा केला जात असला तरी शासनाच्या इतर विभागामार्फत हा खर्च करण्यात येतो. नद्यात पुन्हा गाळ साचणार नाही. याचे नियोजन नसल्याने हा पैसा पाण्यात जातो.