बेरोजगारांना ‘सामाजिक न्याय’
By Admin | Updated: December 8, 2014 00:55 IST2014-12-08T00:55:56+5:302014-12-08T00:55:56+5:30
राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच विदर्भाच्या राजधानीत म्हणजे नागपुरात आलेल्या युती सरकारकडून या भागातील जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी पावले उचलणे सुरू झाले आहे. सामाजिक न्याय

बेरोजगारांना ‘सामाजिक न्याय’
२०० ‘कुलकॅब’चे अधिवेशन काळात होणार वाटप
चंद्रशेखर बोबडे - नागपूर
राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच विदर्भाच्या राजधानीत म्हणजे नागपुरात आलेल्या युती सरकारकडून या भागातील जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी पावले उचलणे सुरू झाले आहे. सामाजिक न्याय खात्याकडून अधिवेशन काळात या खात्याशी निगडित लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी २०० ‘कुलकॅब’ (टॅक्सी) आणि ५० पेक्षा जास्त आॅटोरिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात दाखल झालेले सामाजिक न्याय खात्याचे मंत्री दिलीप कांबळे यांनी रविभवनातील त्यांच्या निवासस्थानी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. खात्याशी संबंधित विविध योजनांची दिशाही त्यांनी स्पष्ट केली. खात्याच्या विदर्भातील अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली असून, त्यांच्याकडून विविध योजनांची माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले. सामाजिक न्याय खात्याच्या विविध महामंडळांच्या लाभार्थ्यांना ‘कुलकॅब’आणि आॅटोरिक्षा वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेरोजगारांना स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
काही महामंडळांकडून चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. यात सुसूत्रता आणून चांगली योजना इतर महामंडळात लागू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात संबंधित व्यवस्थापकीय संचालकांची अलीकडेच एक बैठक झाली. यापूवी महामंडळाचे एम.डी. एकत्र येत नव्हते. यावेळी त्यांना एकत्र बसवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
महामंडळाचे काम लाभार्थ्यांना फक्त कर्ज वाटप करण्यापुरतेच मर्यादित न राहता लाभार्थ्याला त्यांचा उद्योग उभा कसा करता येईल व त्यासाठी त्याला व्यावसायिक प्रशिक्षण कसे देता येईल याचाही विचार पुढच्या काळात केला जाणार आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)