ट्रकमधून प्रतिबंधित पानमसाल्याची तस्करी, १७४ किलोहून अधिक माल जप्त
By योगेश पांडे | Updated: July 22, 2025 20:39 IST2025-07-22T20:38:49+5:302025-07-22T20:39:30+5:30
Nagpur : ट्रकच्या माध्यमातून प्रतिबंधित पानमसाल्याच्या तस्करीचा पोलिसांनी भंडाफोड

Smuggling of banned pan masala from truck, over 174 kg of goods seized
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रकच्या माध्यमातून प्रतिबंधित पानमसाल्याच्या तस्करीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांनी ट्रकमधून १७४ किलोहून अधिक वजनाचा माल जप्त केला आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
संबंधित ट्रक प्रवीण रोडलाइन्सचा आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खडगाव रोड येथील प्रवीण रोडलाइन्सजवळ सापळा रचला व एमएच ४० वाय २३०३ या ट्रकला थांबविले. ट्रकची झडती घेतली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, पानमसाल्यांचे पॅकेट्स होते. त्यांचे वजन १७४.५०० किलो इतके भरले. पोलिसांनी ट्रकचालक अफसर अली सय्यद अली (४१, किन्ही खैरलांजी, बालाघाट, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून प्रवीण रोडलाइन्सचा मालक प्रवीण मेश्राम, कैलास व रूपेश यांचादेखील यात समावेश असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी घटनास्थळावरून ५.०४ लाखांचा माल व ट्रक असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी किरण रंगास्वामी गेडाम यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफसर अलीला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, अमित बंडगर, प्रकाश काटकर, रोशन फुकट, संजय बरेले, योगेश गुप्ता यांच्या पथकाने ही कारवाई केली.