महेंद्र बुरुलेवार लोकमत न्यूज नेटवर्ककेळवद : राज्य सरकारने सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली असली तरी नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील विविध भागात या सुगंधित तंबाखू, गुटख्याचा वापर व मागणी वाढत असल्याने त्यातून या साहित्याची अवैध वाहतूकही वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन धडपडत असले तरी या तस्करीच्या मुळाशी कुणीही जात नाही. लगतच्या मध्य प्रदेशातील पांढुर्णा व छिंदवाडा हे दोन जिल्हे या तस्करीचे मुख्य केंद्र बनले असले तरी ते कायमचे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही. उलट याच तस्करीतून काही मंडळी मालामाल झाली आहे.
केळवद (ता. सावनेर) पोलिस ठाण्याची हद्द मध्य प्रदेशातील पांढुर्णा आणि छिंदवाडा या दोन जिल्ह्यांना लागून आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमधून पांढुर्णा-सावनेरमार्गे नागपूर आणि सौंसर-केळवद-सावनेरमार्गे नागपूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या वाहतुकीसाठी कुप्रसिद्ध होत आहेत. केळवद पोलिस आठवड्यातून किमान एक कारवाई करीत सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणारी वाहने पकडतात. नागपूरसह लगतच्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात याच मार्गाने सुगंधित तंबाखू व गुटखा पोहोचविला जातो. यावरून ही वाहतूक किती मोठ्या प्रमाणात होत असेल, याची जाणीव होते. केळवद पोलिसांनी जानेवारी २०२५ ते आतापर्यंत किमान २० कारवाया करीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार व दुचाकी वाहने पकडली आहे. यात त्यांनी किमान एक कोटी रुपये किमतीच मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून त्यांना हा तंबाखू व गुटखा कुठून व कुणाकडून आणला याची चौकशी पोलिस करतात. केळवदच नव्हे तर नागपूर ग्रामीण पोलिसांना या तंबाखू व गुटखा स्टॉकिस्ट व सप्लायरसह वाहतूकदारांची नावे माहिती आहे. मात्र, यापैकी कुणाची कधीच चौकशी करणे नागपूर ग्रामीण पोलिसांनी योग्य समजले नाही.
यांची चौकशी करणे गरजेचेपांढुर्णा येथील शंकरनामक व्यक्ती या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याचा मोठा स्टॉकिस्ट व सप्लायर असून, त्याच्यासारखे पांढुर्य्यातील चार ते पाच स्टॉकिस्ट व सप्लायर नागपूर जिल्ह्यात नियमित प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याचा पुरवठा करतात. मंगेशला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या वाहतुकीची इत्थंभूत माहिती असते. तो पोलिसांना नियमित माहिती देतो. त्याचे गाव सावनेर-पांढुर्णा मार्गावर केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. पोलिसांनी या दोघांची चौकशी करणे गरजेचे आहे.
रेल्वे क्वॉर्टरचा वापरएका प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा वाहतूकदाराने त्याच्याकडील संपूर्ण साहित्य छिंदवाडा शहरातील एका रेल्वे क्वॉर्टरमधून आणल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे मोठे स्टॉकिस्ट व सप्लायर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा साठवून ठेवण्यासाठी पांडुर्णा, सौंसर व छिंदवाडा शहरांमधील शासकीय इमारती तसेच सीमालगतच्या सावनेर तालुक्यातील छोट्या गावांमधील बंद घरे किंवा फार्म हाउसचा वापर करीत असल्याची शक्यता बळावली आहे.
मंगेशसह इतर झाले मालामालमंगेश पोलिसांना कोणती वाहने पकडायची व कोणती सोडायची, याबाबत सूचना करतो. ज्या वाहनांचे सेटिंग झाले, ती बिनबोभाटपणे निघून जातात, त्यांचे सेटिंग झाले नाही, ती वाहने पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. सेटिंगमधील काही भाग मंगेशला मिळतो तर काही पोलिसांकडे जातो. त्यामुळे मंगेशसह काही पोलिस कर्मचारी कमी काळात मालामाल झाले असून, त्यांच्या संपत्तीची चौकशी करणे आवश्यक आहे.