नायलॉन मांजाची चोरट्या मार्गाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST2021-01-04T04:08:14+5:302021-01-04T04:08:14+5:30
मनपाच्या कारवाईनंतरही ऑनलाईन विक्री : मनपा व पोलीस विभागातर्फे कठोर कारवाईची गरज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संक्रांतीच्या ...

नायलॉन मांजाची चोरट्या मार्गाने विक्री
मनपाच्या कारवाईनंतरही ऑनलाईन विक्री : मनपा व पोलीस विभागातर्फे कठोर कारवाईची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. बंदी असूनही प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू आहे. पोलीसही कारवाई करीत आहेत. परंतु शहरात मांजाची चोरट्या मार्गाने व ऑनलाईन विक्री धडाक्यात सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर मनपा व पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पतंग उडविण्यासाठी लहान मुलांसह मोठ्यातही चढाओढ सुरू झाली आहे. कटलेली पतंग पकडण्यासाठी लहान मुलांची धावपळ सुरू झाली आहे. पतंग काटाकाटी करण्यासाठी नॉयलॉन मांजाची मागणी असल्याने बंद असूनही पतंग विक्रेते नायलॉन मांजा चोरून विकत आहेत.
चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाला जादा पैसे मिळत असल्याने विक्रेते सुरक्षित ठिकाणी मांजा ठेवून त्याची विक्री करीत आहेत. तीन दिवसापूर्वी आदित्य भारव्दाज नावाच्या तरुणाचा गळा मांजामुळे कापला गेला. नायलॉन मांजाला धार असल्याने चेहऱ्यावर आला तर नाक, कान, गळा कापण्याचा धोका असतो. दुचाकी वाहन चालकांच्या जीवावर बेतू शकते.
....
जनजागृतीनंतरही विक्री
प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहेत. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई केली जात आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी कलम १४४ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार विक्रेत्यांवर व वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.