नागपूर विमानतळावर १.६५ कोटींचे तस्करीचे सोने पकडले; केंद्रीय सीमाशुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2023 20:44 IST2023-05-09T20:43:00+5:302023-05-09T20:44:01+5:30
Nagpur News केंद्रीय सीमाशुल्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे कारवाई करीत एका प्रवाशाकडून १ कोटी ६५ लाख रुपये किमतीचे जवळपास २.७ किलो सोने जप्त केले.

नागपूर विमानतळावर १.६५ कोटींचे तस्करीचे सोने पकडले; केंद्रीय सीमाशुल्क विभागाची कारवाई
नागपूर : केंद्रीय सीमाशुल्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे कारवाई करीत एका प्रवाशाकडून १ कोटी ६५ लाख रुपये किमतीचे जवळपास २.७ किलो सोने जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. याआधी जानेवारी महिन्यात विभागाने विमानतळावर पेस्ट स्वरूपात मुंबईहून आणलेले जवळपास १.६ किलो सोने एका प्रवाशाकडून जप्त केले होते.
प्रवाशाने पेस्ट स्वरूपातील सोने सात पॅकेटमध्ये जीन्स पॅन्टच्या आतील भागात स्टीच करून लपवून ठेवले होते. हा प्रवासी कतार एअरवेजच्या विमानाने ९ मे रोजी पहाटे २:३० वाजता दोहा येथून नागपुरात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी या प्रवाशाची कसून चौकशी आणि तपासणी केली. त्याने सोने लपवून आणल्याची कबुली दिली. प्रवाशाने सोने कुणाकडून आणले, नागपुरात कुणाला देणार होता, याची चौकशी करण्यात येत आहे. त्याने सीमाशुल्क १९६२ कायद्याचे उल्लंघन केले असून, त्याअंतर्गत त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चार अधिकाऱ्यांची चमू प्रवाशाची चौकशी करीत आहे.
ही कारवाई केंद्रीय सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष पाटील यांच्या नेतृत्वात सहायक आयुक्त/एआययू अविनाश पांडे आणि पाच अधिकाऱ्यांनी केली.