स्मार्ट मेट्रोत स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर

By Admin | Updated: September 16, 2015 03:45 IST2015-09-16T03:45:46+5:302015-09-16T03:45:46+5:30

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.

Smart Metrot Smart Technology | स्मार्ट मेट्रोत स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर

स्मार्ट मेट्रोत स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर

ब्रिजेश दीक्षित : आधुनिक टेक्नॉलॉजीचे अभियंत्यापुढे आव्हान
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. बांधकामाशी संबंधित अत्याधुनिक ‘बिल्डींग इन्फर्मेशन मॉडेलिंग’ या टेक्नॉलॉजीचा उपयोग मेट्रोच्या निर्मितीत होणार आहे. तसेच मेट्रोच्या संचालनातही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यामुळे हे स्मार्ट तंत्रज्ञान आत्मसात करून घेण्याचे आव्हान आजच्या अभियंत्यापुढे आहे, असे मत नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.
द इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्सच्या नागपूर शाखेतर्फे मंगळवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील द इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्सच्या सभागृहात ४८ व्या अभियंता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ‘ज्ञानाच्या युगात अभियंत्यांपुढील आव्हाने’ विषयावर दीक्षित यांनी विचार मांडले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल घडून येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शहराच्या विकासात योग्य उपयोग करून घेण्याचे आव्हान अभियंत्यांपुढे आहे.
याप्रसंगी नागपूर मेट्रो रेल्वे संदर्भात बोलताना ते म्हणाले की, नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मेट्रोत केला जातो आहे. नागपूर शहरात मेट्रो रेल्वेचे एकूण ३९ किमी लांबीच्या दोन मार्गांवर एकूण ३६ थांबे राहणार आहेत. कमीत कमी खर्चात प्रकल्प साकारण्यावर भर देण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्र, पूर्व व उत्तर नागपुरातील निवासी क्षेत्र तसेच सीताबर्डीसारखे व्यापारी क्षेत्र मेट्रोने जोडणार आहे. याप्रकल्पात सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला जाईल.
सिग्नलिंग व वाहतुकीची व्यवस्था स्वयंचलित राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सुरक्षा नियंत्रित राहील. फीडर बससेवा, तिकिटांसाठी स्मार्टकार्ड आदी अद्ययावत सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण स्मार्ट मेट्रो नागपूरकरांच्या जीवनशैलीत आमूलाग्र परिवर्तन घडविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी हेमंत ठाकरे यांच्याहस्ते ब्रिजेश दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. संजय राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Smart Metrot Smart Technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.