‘एम्स’ची स्मार्ट भरारी
By Admin | Updated: October 8, 2015 02:45 IST2015-10-08T02:45:54+5:302015-10-08T02:45:54+5:30
‘स्मार्ट सिटी’कडे घोडदौड करणाऱ्या उपराजधानीत ‘एम्स’ (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स) येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘एम्स’ची स्मार्ट भरारी
वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण : रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळणार
नागपूर : ‘स्मार्ट सिटी’कडे घोडदौड करणाऱ्या उपराजधानीत ‘एम्स’ (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स) येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाने बुधवारी १ हजार ५७७ कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर शहरात आनंदाचे वातावरण होते. नागपुरातील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ‘एम्स’ मैलाचा दगड ठरणार असून नागरिकांना अत्याधुनिक उपचारांची संधी उपलब्ध होणार आहे. नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रातून या घोषणेचे स्वागत करण्यात आले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी ‘एम्स’ शहरात यावे यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. येत्या पाच वर्षांत ‘एम्स’ची इमारत उभी राहण्याची शक्यता आहे. ९६० खाटा असलेल्या या इस्पितळातून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा तर मिळेलच, शिवाय कुशल डॉक्टरही येथून शिकून बाहेर पडतील.
‘एम्स’साठी मिहान येथील ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित १५० एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘एमएडीसी’ची मंजुरी
नागपूर : ‘एमएडीसी’च्या (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेन्ट कंपनी) संचालक मंडळाने संबंधित जमीन ‘एम्स’ला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. ही जमीन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘एचएससीसी’कडे (हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टंसी कॉर्पोरेशन लिमिटेड) हस्तांतरित करण्यात येईल अशी माहिती ‘एमएडीसी’चे मुख्य अभियंता एस. व्ही. चहांदे यांनी दिली.