काेळसा खाणीतील स्फाेटांमुळे घराचा स्लॅब काेसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 20:48 IST2022-07-09T20:47:50+5:302022-07-09T20:48:20+5:30
Nagpur News कोळसा खाणीतील स्फोटाच्या हादऱ्यामुळे भिवापूर तालुक्यातील बेसूर येथील एका घराचा स्लॅब कोसळला.

काेळसा खाणीतील स्फाेटांमुळे घराचा स्लॅब काेसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना
नागपूर : गाेकुल काेळसा खाणीत अधिक क्षमतेचे स्फाेट घडवून आणले जात असल्याने जमिनीला हादरे बसतात. याच हादऱ्यांमुळे शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी बेसूर (ता. भिवापूर) येथील पुंडलिक महादेव कोडापे (६०) यांच्या घराचा अख्खा स्लॅब काेसळला. घटनेच्यावेळी घरी कुणीही नसल्याने प्राणहानी टळली.
मागील सात वर्षांपासून गाेकुल खाणीतून काेळसा काढला जात आहे. त्यासाठी खाणीत राेज अधिक क्षमतेचे स्फाेट घडवून आणले जातात. शुक्रवारी सायंकाळी खाणीतील स्फाेटामुळे जमिनीला हादरे बसले आणि पुंडलिक काेडापे यांच्या घराचा स्लॅब काेसळला. पुंडलिक काेडापे, त्यांची पत्नी व १९ वर्षीय मुलगा मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ऐन पावसाळ्यात घराचा स्लॅब काेसळल्याने त्यांच्यावर संकट काेसळले आहे.
स्लॅब काेसळल्याने त्यांच्या घरातील सर्व गृहाेपयाेगी साहित्य व धान्य भिजल्याने त्यांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता घरावर नवीन स्लॅब टाकण्यासाठी वेकाेलि व राज्य सरकारने त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी तसेच त्यांची इतरात्र राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.