सहा रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द

By Admin | Updated: August 8, 2015 03:07 IST2015-08-08T03:07:38+5:302015-08-08T03:07:38+5:30

मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे तिसऱ्या दिवशी नागपुरातून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द ....

Six train trains canceled | सहा रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द

सहा रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द

प्रवाशांना बसला फटका : मध्य प्रदेशातील अपघातामुळे घेतला निर्णय
नागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे तिसऱ्या दिवशी नागपुरातून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. ऐनवेळी त्यांना मिळेल त्या वाहनाने आपल्या इच्छित स्थळी जाण्याची पाळी आली. यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशातील हरदा येथे तीन दिवसांपूर्वी दोन रेल्वेगाड्यांचे डबे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला होता. यामुळे मुंबई-इटारसी मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला होता. दरम्यान नागपुरात न येणाऱ्या काही रेल्वेगाड्या नागपूरमार्गे वळविण्यात आल्या होत्या. यामुळे नागपूर-वर्धा या मार्गावर आधीच क्षमतेपेक्षा जास्त गाड्या चालविण्यात येत असल्यामुळे या रुळावरील वाहतूक अतिशय व्यस्त झाली होती. दरम्यान ७ आॅगस्टला या मार्गावरील सहा रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे ऐनवेळी आपली रेल्वेगाडी रद्द झाल्याची माहिती मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्यांना आपले तिकीट रद्द करून इतर वाहनांनी जाण्याची पाळी आली. यात अनेक प्रवाशांनी दोन महिन्यापूर्वी आपल्या तिकिटांचे आरक्षण करून कन्फर्म तिकीट मिळविल्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या १० आॅगस्टपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप होणार आहे, हे विशेष. दरम्यान प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपल्या गाड्यांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी ०७१२-२५६४३४३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)
थर्डलाईन अभावी वाहतूक विस्कळीत
नागपूर-वर्धा मार्गावर अप आणि डाऊन या दोन लाईन सुरू आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथे थर्डलाईनची मागणी होत आहे. सध्या दररोज १०० रेल्वेगाड्या चालविण्याची या रेल्वे रुळांची क्षमता आहे. परंतू तरीसुद्धा १३५ रेल्वेगाड्या दररोज चालविण्यात येत आहेत. त्यामुळे येथे थर्डलाईन गरजेची होती. मध्य प्रदेशात हरदा येथे झालेल्या अपघातामुळे नागपूरमार्गे रेल्वेगाड्या वळविण्यात आल्यामुळे या रेल्वे रुळावरील ताण मागील तीन दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. थर्ड लाईनचे काम पूर्ण झाले असते तर ही वाहतूक सुरळीत झाली असती.

Web Title: Six train trains canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.