Corona Virus in Nagpur; एकच व्हेंटिलेटर दोन रुग्णांसाठी वापरता येणार; व्हीएनआयटीने विकसित केले व्हेंटिलेटर स्प्लिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 22:34 IST2020-04-27T22:34:02+5:302020-04-27T22:34:23+5:30
संपूर्ण देशासह उपराजधानीदेखील कोरोनाशी लढा देत असताना वैद्यकीय क्षेत्रासमोर व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेची चिंता निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीत विशेष संशोधन करण्यात आले व विशेष व्हेंटिलेटर स्प्लिटर विकसित करण्यात आले आहे.

Corona Virus in Nagpur; एकच व्हेंटिलेटर दोन रुग्णांसाठी वापरता येणार; व्हीएनआयटीने विकसित केले व्हेंटिलेटर स्प्लिटर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण देशासह उपराजधानीदेखील कोरोनाशी लढा देत असताना वैद्यकीय क्षेत्रासमोर व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेची चिंता निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीत विशेष संशोधन करण्यात आले व विशेष व्हेंटिलेटर स्प्लिटर विकसित करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून एकच व्हेंटिलेटरचा दोन रुग्णांसाठी एकाच वेळी वापर करणे शक्य होणार आहे. हे स्प्लिटर्स इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परीक्षणासाठी देण्यात आले आहेत.
कोरोनाबाधितांची प्रकृती बिघडल्यानंतर श्वास घेण्यास अडथळे येतात व अशा वेळी व्हेंटिलेटर अत्यावश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात केवळ ४८ हजार व्हेंटिलेटर्स आहेत. ही कमी संख्या वैद्यकीय क्षेत्रासमोर चिंता बनली आहे. यासंदर्भात संशोधनासाठी मेयोतील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांना संपर्क केला होता. डॉ. पडोळे हे स्वत: बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये कार्य करत असल्याने त्यांनी यात पुढाकार घेतला. अथक प्रयत्नांनंतर टू वे व्हेंटिलेटर स्प्लिटर विकसित करण्यात आले. यात डिजिटल मॅन्युफॅक्च रिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला.
व्हीएनआयटीतर्फे हे स्प्लिटर परीक्षणासाठी मेयोला सुपूर्द करण्यात आले व तेथे एनास्थेसिआॅलॉजीच्या प्रोफेसर डॉ. वैशाली शेलगावकर यांनी ट्रायल्स घेतले. घनफळ व दबाव या दोन्ही मोडवर याचे परीक्षण झाले. या यंत्रामुळे डॉक्टर एकाच व्हेंटिलेटरचा दोन रुग्णांसाठी उपयोग करु शकणार आहेत. आपात्कालीन स्थितीत व्हेंटिलेटरला एक किंवा अधिक स्प्लिटर जोडले तर एकाच वेळी चार रुग्णांवर उपचार होऊ शकतात. परंतु वास्तविक उपचारांदरम्यान असा प्रयोग धोकादायक असू शकतो. परंतु निश्चितपणे या स्प्लिटरमुळे समान रोगचिकित्सा असलेल्या दोन रुग्णांवर एकाच व्हेंटिलेटरच्या माध्यमातून उपचार होऊ शकतात, असे डॉ. शेलगावकर यांनी सांगितले. व्हीएनआयटीचे डॉ. शीतल चिद्दरवार व अभिजीत राऊत यांच्या प्रयत्नांतून स्प्लिटर व स्ट्रेन रिलिव्हर विकसित करण्यात आले. मेयोकडून डॉ. शेलगावकर यांच्यासह डॉ. मेधा संगावार, डॉ. उमेश रमतानी, डॉ. समृद्धी, डॉ. केतन व डॉ. नागेश यांचे सहकार्य लाभले.
मास्कमुळे येणार नाही कानांवर ताण
यासोबतच व्हीएनआयटीने वैद्यकीय तज्ज्ञांना दिलासा देणारे संशोधनदेखील केले आहे. सतत एन-९५ किंवा इतर मास्कचा उपयोग केल्याने डॉक्टरच्या कानांची अनावश्यक ओढाताण होते. व्हीएनआयटीने इअर स्ट्रेन रिलिव्हर तयार केले आहे. मास्कच्या इलेस्टिकवर याचे रोपण केले असता कानांवरचा हा ताण नाहीसा होऊ शकतो, असा दावा व्हीएनआयटीतर्फे करण्यात आला आहे.