‘सिंगल फेज लाईन’ ठरताहेत निरुपयोगी?

By Admin | Updated: December 5, 2014 00:40 IST2014-12-05T00:40:50+5:302014-12-05T00:40:50+5:30

भारनियमनावर उपाय म्हणून राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावांत ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा दिला. भारनियमनाच्या काळात ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित करून ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा

The 'single phase line' is being useless? | ‘सिंगल फेज लाईन’ ठरताहेत निरुपयोगी?

‘सिंगल फेज लाईन’ ठरताहेत निरुपयोगी?

आठ तासांचे भारनियमन : विद्युत देयकांत अवाजवी वाढ
हिवराबाजार : भारनियमनावर उपाय म्हणून राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावांत ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा दिला. भारनियमनाच्या काळात ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित करून ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा सुरू असायचा. मात्र, हल्ली ‘सिंगल फेज’ लाईनवरही रोज किमान सहा ते आठ तास भारनियमन केले जात असल्याने ही लाईन निरुपयोगी ठरत आहे.
रामटेक तालुक्यातील हिवराबाजार हा परिसर आदिवासीबहुल आहे. देवलापार व हिवराबाजार परिसरातील प्रत्येक गावात ‘सिंगल फेज’ लाईन टाकण्यात आली. सुरुवातीला काही दिवस ‘सिंगल फेज’ विद्युुत पुरवठा नियमित केला जायचा. ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित असलेल्या काळातही ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा सुरळीत असायचा.
हल्ली भारनियमनाच्या नावाखाली ‘थ्री फेज’सोबतच ‘सिंगल फेज’ वीजपुरवठादेखील खंडित केला जातो. रोज किमान सहा ते आठ तास ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ‘सिंगल फेज’ लाईन टाकण्यासाठी तसेच स्वतंत्र ट्रॉन्सफार्मर लावण्यासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ गेल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली आहे.
रोज सहा ते आठ तास ‘सिंगल फेज’ व ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने या परिसरात राईस मील, पीठ गिरणी, फेब्रिकेशन वर्कशॉप यासह झेरॉक्स मशीन, कम्प्युटर इन्स्टिट्यूट यासह अन्य महत्त्वाचे व्यवसाय भारनियमनाच्या काळात बंद असतात. आठवड्यातील बहुतांश दिवस दिवसा भारनियमन करण्यात येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांची मोठी अडचण होत आहे. शिवाय, पिठाची गिरणी बंद राहात असल्याने नागरिकांनाही त्रास सहन कारावा लागतो. या भारनियमनामुळे काही गावांमधील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली असून, तेथील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
हा संपूर्ण परिसर देवलापार येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयाला जोडण्यात आला आहे. सदर कार्यालय देवलापार येथील आठवडी बाजाराच्या दिवशी उघडले जाते. एरवी ते आठवडाभर बंदच असते. त्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अधिकारीच त्यांच्या कार्यालयात कधीकाळी हजर राहात असल्याने गाव पातळीवर काम करणाऱ्या लाईनमनवर कुणाचाही वचक राहिला नाही. (वार्ताहर)

Web Title: The 'single phase line' is being useless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.