साध्या ताप, सर्दी, खोकल्यानेही वाढवली कोरोनाची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:31+5:302021-04-16T04:08:31+5:30
कुही : तालुक्यातील कुही, मांढळ, वेलतुर, साळवा व तितूर या मोठ्या गावातील खासगी तथा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ...

साध्या ताप, सर्दी, खोकल्यानेही वाढवली कोरोनाची धास्ती
कुही : तालुक्यातील कुही, मांढळ, वेलतुर, साळवा व तितूर या मोठ्या गावातील खासगी तथा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात अंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे; मात्र साध्या ताप, सर्दी व खोकल्याने नागरिकांमध्ये कोरोनासारख्या महामारीची धास्ती निर्माण केली आहे. इकडे तालुक्यातील प्रत्येक गावात मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. आधीच कोरोना महामारीने जनता भयभीत आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक गावात मृतांची संख्या वाढत असल्याने नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. तालुक्यात कोरोना बाधितांचे आकडे वाढत असतानाच व्हायरलने सर्दी, ताप, खोकल्याने डोके वर काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता मिळेल त्या डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करीत आहे. त्यामुळे आपल्यालाही कोरोना झाला तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची व्यवस्था केली; मात्र गत दोन दिवसांपासून तालुक्यात लसच नसल्याने जनतेचा मोठा हिरमोड होत आहे. त्यामुळे गरीब जनतेने कोरोनाला हरविण्यासाठी कोणाकडे आस धरायची, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. आज जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी बेड शिल्लक नाही. खासगी दवाखान्यात उपचार करतो म्हटले तर सुरुवातीलाच लाखाच्यावर पैसे जमा करावे लागतात. गत वर्षभरापासून अनेकांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. श्रीमंत कोरोनाग्रस्त झाल्यास तो पैशाच्या बळावर उपचार करून घेऊन स्वत:चा जीव तरी वाचवेल; मात्र एखाद्या गरिबाला कोरोनाची लागण झाल्यास त्यांनी घरीच मरायचे काय, असा प्रश्न गरीब जनतेसमोर आ वासून उभा आहे.