पाच दिवसांत चांदी १२,४०० रुपयांनी उतरली!
By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 6, 2025 21:09 IST2025-04-06T21:08:47+5:302025-04-06T21:09:00+5:30
अशातच आता लग्नसराईमुळे सोने खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.

पाच दिवसांत चांदी १२,४०० रुपयांनी उतरली!
मोरेश्वर मानापुरे, नागपूर : गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोने-चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टने कोसळले. नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ पाच दिवसात चांदी किलोमागे जीएसटीविना १२,४०० रुपयांनी घसरली, तर दहा ग्रॅम शुद्ध सोने २,३०० रुपयांनी उतरले. सोने-चांदी स्वस्त झाल्याने लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला, परंतु भावपातळी पाहता सोन्याचे भाव अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.
दुसरीकडे ग्राहक भाव कमी होण्याची वाट पाहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला टेरिफ वॉर आणि डॉलरचे दर कमी झाल्याने दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशातच आता लग्नसराईमुळे सोने खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.
दोन्ही धातूंचे भाव सारखेच !
सोने आणि चांदीच्या भावाची तुलना केल्यास एप्रिल महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव जवळपास ८९ हजारांवर आले आहेत. ४ एप्रिलच्या ९४ हजारांच्या तुलनेत ५ रोजी चांदी तब्बल ५ हजार रुपयांनी कमी होऊन ८९ हजारांवर, तर सोने ४ एप्रिलच्या ९१,४०० रुपयांच्या तुलनेत ५ रोजी २,३०० रुपयांनी घसरले आणि ८९,१०० रुपयांवर स्थिरावले. भाव अचानक कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीची संधी आहे. सराफांकडे ३ टक्के जीएसटीसह सोने ९१,७७३ रुपये आणि चांदीचे भाव ९१,६७० रुपये आहेत.
सोने-चांदीचे भाव
दिनांक सोने (२४ कॅरेट) चांदी (प्रति किलो)
१ एप्रिल ९१,४०० १,०१,४००
२ एप्रिल ९१,४०० १,००,४००
३ एप्रिल ९१,२०० ९६,५००
४ एप्रिल ९१,४०० ९४,०००
५ एप्रिल ८९,१०० ८९,०००
(३ टक्के जीएसटी वेगळा)