लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या फाईल्स बिअर बारमध्ये घेऊन त्यावर स्वाक्षरी करीत असल्याचा प्रकार लोकमतने सोमवारी उघडकीस केले. या घटनेमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईल्स नेमक्या कोणत्या विभागाच्या होत्या व ते कर्मचारी कोण याबाबत सोमवारी दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती.शहरातील मनीषनगर भागातील एका बारमध्ये रविवारी सुटीच्या दिवशी तीन व्यक्ती महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्सचा गठ्ठा घेऊन बसले होते. त्यापैकी एक व्यक्ती त्या फाईलवर स्वाक्षरी करीत होता. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वर्धा येथे पत्रकारांनी नागपूरच्या घटनेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले " विभागीय आयुक्तांशी मी याबाबत बोललेलो आहे, सायबर शाखेसोबतही सोबतही चर्चा केली आहे आणि त्यांना यासंदर्भातील अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. येत्या तीन दिवसात या प्रकरणात कारवाई झाल्याचे दिसेल. पालकमंत्री म्हणून मी या घटनेचे पूर्ण विश्लेषण करणार आहे कोणत्या विभागाची फाईल हे याची चौकशी सुरू झालेली आहे.
विभागीय आयुक्तांनी सुरू केली चौकशीदरम्यान विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. याची सखोल चौकशी केली जात आहे. सर्वप्रथम पोलिसांना या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगण्यात आले आहे. त्यातून त्या फाईल नेमक्या कोणत्या विभागाच्या होत्या. कोण घेऊन गेले. याची माहिती मागविली आहे. ही माहिती येताच पुढची कारवाई केली जाईल.