श्री गणेश विसर्जन निर्विघ्न ! ४० हजारांवर गणपतीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:03 AM2019-09-14T01:03:20+5:302019-09-14T01:07:19+5:30

शुक्रवारी रात्री ९ पर्यंत ५२० सार्वजनिक गणेश आणि ४०,५०० घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. नागपूर शहरात कोणताही वाद विवाद अथवा कसलीही अनुचित घटना घडली नाही.

Shri Ganesh immersion peaceful! The immersion of Ganapati on 40 thousand | श्री गणेश विसर्जन निर्विघ्न ! ४० हजारांवर गणपतीचे विसर्जन

श्री गणेश विसर्जन निर्विघ्न ! ४० हजारांवर गणपतीचे विसर्जन

Next
ठळक मुद्देअडीच हजार पोलीस रात्रंदिवस ऑनड्युटी : पोलीस आयुक्तांचेही पहाटेपर्यंत जागरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन करून गेल्या ४८ तासापासून पोलीस रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. विसर्जन चांगल्या प्रकारे पार पडावे, यासाठी पोलीस कर्मचारीच नव्हे तर स्वत: पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पहाटेपर्यंत जागरण केले. त्यामुळे शुक्रवारी रात्री ९ पर्यंत ५२० सार्वजनिक गणेश आणि ४०,५०० घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. शहरात कोणताही वाद विवाद अथवा कसलीही अनुचित घटना घडली नाही. 


विसर्जनाच्या मिरवणुकीचा बंदोबस्त १२ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आला होता. त्यासाठी ११ सप्टेंबरपासून ९ पोलीस उपायुक्तांसह २,५०० पोलीस नियुक्त करण्यात आले होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनात श्री गणेश विसर्जन बंदोबस्तात कुणाची जबाबदारी काय राहील हे ठरविण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर तसेच डॉ. शशिकांत महावरकर विसर्जनाच्या बंदोबस्तावर देखरेख ठेवणार होते. कुठे काय बदल करायचा, हे त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी उपद्रव करू नये म्हणून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात परिमंडळनिहाय पथके तयार करण्यात आली होती. संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी घातपातविरोधी पथके नियमित तपासणी करताना दिसत होते. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कसलाही वादविवाद, गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व ठाणेदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या निरंतर संपर्कात होते. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही मार्गावर अडसर निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी १२ ही सेक्टरमध्ये वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्यावर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित विशेष लक्ष ठेवून होते. वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जयेश भांडारकर यांचीही सुरळीत वाहतुकीसाठी धावपळ दिसून येत होती. सर्वच पोलीस उपायुक्त आपापल्या परिमंडळात रस्त्यावर फिरताना आणि बंदोबस्ताचा आढावा घेताना दिसत होते.

उत्कृष्ट नियोजन !
कोराडी तलाव, वेणा नदी, महादेव घाट, गांधीसागर तलाव, सक्करदरा तलाव अशा १० ठिकाणी विसर्जन होणार म्हणून त्या त्या ठिकाणी नियोजन केले होते. मात्र, गुरुवारी प्रशासनाने फुटाळा वगळता अन्य तलावावर विसर्जनास बंदी केल्याने फुटाळा तलावावर मोठी गर्दी वाढली. त्यामुळे अनेक ठिकाणचा पोलीस बंदोबस्त फुटाळ्याकडे वळविण्यात आला. येथे पोलिसांनी अस्थायी नियंत्रण कक्ष तयार केले. श्री गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या. रविनगर चौकापासून कॅम्पस चौकापर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी वाढली होती. मात्र, पोलिसांचे नियोजन उत्कृष्ट होते. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनाच नव्हे तर या मार्गाने नियमित येणे जाणे करणाऱ्यांनाही कसलाच त्रास झाला नाही. मोठ्या संख्येत वाहने आणि भाविकांची गर्दी होऊनही वाहतूक कुठेही रखडली नाही. शंभरावर पोलीस फुटाळा चौकात त्यासाठी कर्तव्य बजावत होते. पहाटे ३. ३० वाजेपर्यंत विसर्जनाचा जल्लोष सुरू होता अन् पोलीस कर्मचारी अन् अधिकारीच नव्हे तर खुद्द पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हेदेखील जागरण करत बंदोबस्तावर नजर ठेवून होते.
नागपूरकरांना धन्यवाद !डॉ. उपाध्याय 

एवढ्या मोठ्या प्रमाणात श्री गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. मोठमोठ्या मिरवणुका निघाल्या. ढोल ताशांचा गजर झाला. गुलाल उधळला गेला मात्र कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व काही जल्लोषात अन् आनंदात पार पडले. याचे सर्व श्रेय नागपूरकर नागरिकांना जाते. पोलिसांनी कितीही चांगले नियोजन केले तरी जोपर्यंत नागरिक सहकार्य करत नाही तोपर्यंत पोलिसांच्या परिश्रमाला अर्थ नसतो. मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करून नागपूरकरांनी येथून सर्वधर्मसमभाव तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली, त्याबद्दल नागपूरकरांना धन्यवाद देतो, अशी भावना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना नोंदवली.

Web Title: Shri Ganesh immersion peaceful! The immersion of Ganapati on 40 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.