'बिला'वरुन वाद झाला अन् दुकानदाराने घेतला ग्राहकाला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 12:39 PM2021-10-21T12:39:18+5:302021-10-21T13:13:14+5:30

कॅरिबॅग आणि बिल का मागितले, यावरून एका दुकानदाराने ग्राहकासोबत वाद घातला. केवळ वादच घातला नाही तर संबंधित ग्राहकाच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतला.

shopkeeper and customer fight over purchase bill goes wrong | 'बिला'वरुन वाद झाला अन् दुकानदाराने घेतला ग्राहकाला चावा

'बिला'वरुन वाद झाला अन् दुकानदाराने घेतला ग्राहकाला चावा

googlenewsNext

नागपूर : दुकानातून सामान घेतल्यानंतर प्रत्येक ग्राहक दुकानदाराकडून बिल मागतोच असं नाही. पण एका ग्राहकाला दुकानदाराला बिल मागणे चांगलेच महागात पडले आहे. बिल आणि कॅरिबॅग मागितली म्हणून दुकानदाराने रागात भरात ग्राहकाच्या हातालाच चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 

'जागो ग्राहक जागो' ही जाहिरात घराघरांत पोहचली आहे. ही जाहिरात दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर आपण पाहतच असतो. दुकानातून घेतलेल्या सामानाच बिल मागणं हा ग्राहकाचा अधिकार परंतु, प्रत्येक दुकानदार बिल देतोच असं नाही. कित्येकदा बिल मागूनही दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे कधी-कधी वादही होतात. नागपुरातही कॅरिबॅग आणि बिल का मागितले, यावरून एका दुकानदाराने ग्राहकासोबत केवळ वादच घातला नाही तर संबंधित ग्राहकाच्या डाव्या हाताच्या दंडाला चावाही घेतल्याचे समोर आले आहे.

ही घटना बेलतरोडी ठाण्यांतर्गत बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या दरम्यान घडली. अशोक शामराव फुलझेले (४०) रा. न्यू नरसाळा नीलविहार कॉलनी असे संबंधित ग्राहकाचे नाव आहे. तर हर्ष लिंगे असे आरोपी दुकानदाराचे नाव आहे. हर्ष याचे मनीषनगरात ओम साई डेली निड्स नावाचे दुकान आहे.

१३ ऑक्टोबरला रात्री ९.१५ वाजता अशोक पेपर नॅपकिन घेण्यासाठी हर्षच्या दुकानात गेले होते. सामान खरेदी केल्यानंतर त्यांनी हर्षला कॅरिबॅग मागितली. त्याने कॅरिबॅग देण्यास नकार दिला. त्यानंतर अशोकने सामानाचे बिल मागितले. त्यावरून हर्षने त्यांच्याशी वाद घातला. अशोक आपल्या म्हणण्यावर कायम होते तर, हर्ष बिल देण्यास तयार नव्हता. वाद वाढला आणि हर्षने रागाच्या भरात बिल नाही देत जा! म्हणत अशोकच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेऊन त्यांना दुखापत केली. या प्रकरणी अशोकच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी हर्षविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, या घटनेची परिसरात एकच चर्चा सुरू आहे.

Web Title: shopkeeper and customer fight over purchase bill goes wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.