धक्कादायक ! ‘बाजीराव’ वाघाच्या अवयवाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:54 IST2018-02-23T23:53:26+5:302018-02-23T23:54:05+5:30
कळमेश्वर जंगलातील वाघ ‘बाजीराव’चा शवविच्छेदनाच्यादरम्यान अवयव चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खापा वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत वाघिणीचा पंजा कापून घेऊन जाणाच्या प्रयत्नातही हाच डॉक्टर होता, असेही आरोपात नमूद आहे.

धक्कादायक ! ‘बाजीराव’ वाघाच्या अवयवाची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमेश्वर जंगलातील वाघ ‘बाजीराव’चा शवविच्छेदनाच्यादरम्यान अवयव चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खापा वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत वाघिणीचा पंजा कापून घेऊन जाणाच्या प्रयत्नातही हाच डॉक्टर होता, असेही आरोपात नमूद आहे. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी हा आरोप केला असून या संदर्भातील तक्रार सीसीटीव्ही फुटेजसह उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. एन. रामबाबू यांच्याकडे केली आहे.
२९ डिसेंबर २०१७ रोजी कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील बाजारगाव जवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने नर वाघ, ‘बाजीराव’चा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी वाघाचे शव नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील‘ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ येथे रात्री आणले. दुसऱ्या दिवशी ३० डिसेंबर सकाळी १० वाजता शवविच्छेदन होणार असल्याने वाघाच्या शवाला शस्त्रक्रियागृहात सील करून ठेवण्यात आले. नियमानुसार शवविच्छेदन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तीन पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वनाधिकारी यांच्या समक्ष ‘आॅन कॅमेरा’ होणे आवश्यक असते. यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तीन वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदनास हजर राहणार होते. परंतु शवविच्छेदनाच्या दिवशी सकाळी ९.१२ वाजता डॉ. बहार बाविस्कर पोहचले आणि शस्त्रक्रियागृहात जाऊन वाघाच्या शरीराचे मोजमाप घेणे सुरू केले. याच दरम्यान कुंदन हाते तिथे पोहचल्यावर त्यांना हटकले आणि शस्त्रक्रियागृहातून बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी हजर झाल्यानंतर शवविच्छेदन प्रक्रियेला सुरुवात होऊन वाघाच्या शरीराच्या आतील अवयव न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्यासाठी ते काढले जात होते. शवविच्छेदन संपल्यानंतर वाघाला बाहेर जाळण्यासाठी नेले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र डॉ. बाविस्कर नव्हते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेसाठी बाटलीत बंद करून ठेवलेले वाघाच्या आतील शरीरातील ११ अवयवाच्या नमुन्यामधील एक बॉटल तिथे नव्हती. याच्या तपासणीसाठी डीसीएफ जी. मल्लिकार्जुन यांच्या परवानगीने सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यात डॉ. बाविस्कर सकाळी ११.५५ वाजता वाघाच्या शरीरातील ‘टेपवर्म’च्या नमुन्याची बॉटल आपल्या बॅगमध्ये भरताना दिसून आले. याची माहिती डीसीएफ आणि कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांना देण्यात आली.