धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
By योगेश पांडे | Updated: April 28, 2025 00:27 IST2025-04-28T00:26:26+5:302025-04-28T00:27:01+5:30
न्यूयॉर्कची ब्रोकर कंपनी लिलाव करणार, कंपनीपर्यंत तलवार गेलीच कशी?

धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपुरातील भोसले घराण्याची संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार चक्क एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या एका ब्रोकर कंपनीकडून हा लिलाव करण्यात येत आहे. संबंधित तलवार ही नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली याचा शोध भोसले घराण्याकडून घेण्यात येत आहे.
‘सोथबाय’ या कंपनीकडून ऑनलाईन ब्रोकर कंपनीकडून ही तलवार विक्रीला ठेवण्यात आली आहे. संंबंधित कंपनी ब्रिटीशांकडून स्थापित मल्टिनॅशनल कंपनी असली तरी याचे मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. कंपनीने सात हजार ग्रेट ब्रिटन पाऊंडपासून(७.९५ लाख रुपये) लिलाव सुरू करण्यात येणार आहे. या लिलावासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भोसले घराण्यालादेखील धक्का बसला आहे. ही तलवार आमच्याकडे परत यावी यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असल्याची माहिती राजे मुधोजी भोसले यांनी दिली.
ब्रिटीशांनी लुटली की अधिकाऱ्यांनी चोरली?
संबंधित तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली हे मोठे कोडेच आहे. १८५३ ते १८६४ या कालावधीत महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) उर्फ (आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युध्द झाले होते. त्याच कालावधीत इंग्रजांनी ब्रिटीशांनी नागपूरकर भोसल्यांचा खजिना लुटला होता. त्यात अनेक रत्नजड़ित दागदागिने, शस्त्रसाठा व तलवारींची लूट करण्यात आली होती. त्या लुटीत कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता आहे. याशिवाय एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही तलवार लपुन नेली आसावी व कालांतराने तिची विक्री केली असावी अथवा कुणाला भेट दिली असावी. ही तलवार ऐतिहासिक शस्त्रांचे जतन करून त्यांची विक्री करणाऱ्या कंपनीकडे कशी आली हा मोठा प्रश्न आहे.
अशी आहे 'ती' तलवार
संबंधित तलवार ही युरोपियन शैलीतील आहे. त्यावर देवनागरी लिपीने अंकित करण्यात आले असून सोन्याने जडविलेली मूठ आहे. तसेच त्यात हिरव्या विणलेल्या लोकरीची पकडदेखील आहे. या तलवारीत एकेरी ब्लेड आहे. ही तलवार १२४ सेमी लांबीची आहे.