नरेश डोंगरे -नागपूर : कर्तव्यावर असलेल्या टीसीला एका प्रवाशाने शाैचालयात ओढून बेदम मारहाण केली. त्यांचे कपडे फाडले, रक्कम लुटली आणि ओळखपत्रासह महत्वाची कागदपत्रे ट्रेनच्या खाली फेकून दिली. मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर एलटीटी हटिया एक्सप्रेसमध्ये ही खळबळजनक घटना घडली. मंगळवारी या घटनेचे वृत्त उघड झाल्यापासून रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
फिर्यादी टीसी हे ३५ वर्षांचे असून ते अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहेत. २९ जूनला सकाळी १० वाजता ते नेहमी प्रमाणे कर्तव्य बजावत होते. बडनेरा स्थानकावर एलटीटी हटिया-एक्सप्रेसमध्ये त्यांना एक प्रवासी विनातिकिट आढळला. प्रवाशाने त्याच्याकडे तिकिट नसल्याचे कबुल करून आपण गाडीत तिकिट बणवू असे म्हणत टीसींना जनरल कोचमध्ये नेले. कोचमधील शाैचालयाजवळ जाताच त्याने दार उघडून टीसीला आत ओढले. दार बंद करून टीसीला बेदम मारहाण सुरू केली. एवढ्यात गाडी वर्धेकडे निघाल्याने चालू गाडीच्या आवाजात टीसीची आरडाओरड दबली. दरम्यान, आरोपीने टीसीला बेदम मारहाण करतानाच त्यांच्या जवळचा पेन घेऊन त्यांना शरिरावर ठिकठिकाणी टोचले. एवढेच नव्हे तर आरोपीने त्यांना रक्त निघेपर्यंत कडाडून चावे घेतले. हे करतानाच खिडकीची काच फोडून टीसीजवळचे पैसे हिसकावून घेतले. मोबाईल आणि कागदपत्रांसह रेल्वेचे आयकार्ड हिसकावून ट्रेनच्या खिडकीबाहेर फेकले. टीसीचा गणवेश फाडला. चिंध्या केलेला शर्ट अंगातून काढत तोसुद्धा बाहेर फेकून दिला.सहकाऱ्यामुळे बचावले -धावत्या ट्रेनमध्ये हा धक्कादायक प्रकार सुरू असताना दुसरे टीसी विजयसिंह चव्हाण यांना शंका आल्याने त्यांनी प्रवाशांना गोळा करून दार उघडण्यास बाध्य केले. त्यानंतर आरोपी तसेच रक्तबंबाळ अवस्थेतील पीडित टीसीला बाहेर ओढले. चव्हाण यांनी लगेच फोनवरून या घटनेची माहिती रेल्वेच्या वरिष्ठांना दिली.वर्धा स्थानकावर आरोपी जेरबंद -सकाळी १०.४५ वाजता ट्रेन वर्धा स्थानकावर पोहचताच प्रवाशांच्या मदतीने ताब्यात घेतलेल्या आरोपीला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर जखमी टीसीवर उपचार करण्यात आले. या प्रकारामुळे पीडित टीसींना मोठा मानसिक धक्का बसला आहे.आरोपी कल्याणमधील रहिवासी -सिनेस्टाईल खलनायक बनलेल्या आरोपीचे नाव शहजाद शब्बीर शेख (वय ३०) असून तो ठाणे जिल्ह्यातील टिटवाडा (ईस्ट कल्याण) येथील रहिवासी असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. त्याला अटक करण्यात आली आहे.