धक्कादायक : नागपुरात ९९३० लोकांना श्वानदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 21:03 IST2018-09-27T20:57:40+5:302018-09-27T21:03:39+5:30
भारतात ‘रेबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रेबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. उपराजधानीत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षात ९९३० लोकांना श्वानांनी दंश केला आहे. श्वानदंशानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून अॅन्टीरेबिज लस दिली जाते, परंतु महिनाभरापासून शासकीय रुग्णालयांमध्ये ‘अॅन्टीरेबिज’ लसच उपलब्ध नाही. महागडी असलेली ही लस विकत घेणेही गरिबांना परडवणारे नसल्याने, अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

धक्कादायक : नागपुरात ९९३० लोकांना श्वानदंश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात ‘रेबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रेबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. उपराजधानीत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षात ९९३० लोकांना श्वानांनी दंश केला आहे. श्वानदंशानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून अॅन्टीरेबिज लस दिली जाते, परंतु महिनाभरापासून शासकीय रुग्णालयांमध्ये ‘अॅन्टीरेबिज’ लसच उपलब्ध नाही. महागडी असलेली ही लस विकत घेणेही गरिबांना परडवणारे नसल्याने, अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
श्वानदंशामुळे देशात दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा ‘रेबिज’मुळे मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किमंत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ ‘बीपीएल’च्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे धोरण आहे. परंतु गेल्या महिन्यापासून या दोन्ही रुग्णालयात अॅन्टीरेबिज लसच नाही. स्थानिक स्तरावर लस विकत घेण्याचेही प्रमाण फार कमी आहे. आठवड्यापासून महापालिकेच्या दवाखान्यातही ही लस मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. औषध विक्रेत्यांकडेही फार कमी प्रमाणात या औषधांचा साठा आहे. यामुळे या लसीला घेऊन सामान्यांचा जीव मेटाकुटीस आल्याचे चित्र आहे.
महिन्याकाठी ५०० लसींची गरज
मेयो व मेडिकलमध्ये आठवड्याभरात सुमारे ७० ते ८० वर अॅन्टीरेबिज लसीची गरज भासते. महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलला दरमहा ५०० अॅन्टीरेबिज लसी लागतात. ही लस ‘इंडियन इम्युनॉलॉजिकल’कडूनच मिळते. सूत्रानुसार, मागणीच्या तुलनेत फार कमी साठा पुरवठादाराकडून मिळतो. यातच गेल्या काही महिन्यांपासून पुरवठादाराने लसीचा पुरवठा करणे बंद केले आहे. परिणामी, तुटवडा निर्माण होतो. यातच स्थानिक खरेदीवर मर्यादा आल्याने या दोन्ही रुग्णालयात लस नसल्याचे सांगण्यात येते.
‘हाफकिन’कडून प्रतीक्षा
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मेडिकलला औषधे पुरवठा करण्याची जबाबदारी ‘हाफकिन कॉर्पाेरेशन कंपनी’कडे देण्यात आली आहे. परंतु या कंपनीकडून अद्यापही अॅन्टीरेबिज लसीसह इतरही आवश्यक औषधे उपलब्ध न झाल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
कुत्र्यांच्या झुंडीकडे दुर्लक्षच
शहरातील रस्त्यावर रात्री कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येतात. रात्रपाळी करून घरी परतणाºया नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. जाटतरोडी चौक ते मेडिकल चौक मार्ग, लोखंडी पूल ते शनिमंदिर, मानेवाडा रिंग रोड, उंटखाना चौक ते अशोक चौक, प्रतापनगर सिमेंट रोड ते गोपालनगर, काचीपुरा रामदासपेठ मार्ग, अभ्यंकरनगर रोड, सुगतनगर मार्ग, लष्करीबाग चौक ते वैशालीनगर चौक, अजनी क्वार्टर, नवीन बाभूळखेडा यासह जिथे-जिथे उघड्यावर मांसविक्री होते तिथे-तिथे या झुंडी दिसून येतात. परंतु याकडे अद्यापही महापालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येते.