नागपुरात दिमाखदार सोहळ्यात झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:04 IST2018-06-25T23:32:03+5:302018-06-26T00:04:01+5:30
महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री शिवराज्याभिषेक समारोह समितीद्वारे सोमवारी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला.

नागपुरात दिमाखदार सोहळ्यात झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री शिवराज्याभिषेक समारोह समितीद्वारे सोमवारी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला.
जय भवानी, जय शिवाजीचा गजर, ढोलताशांची गर्जना सोबतच भव्य पालखी यात्रा काढण्यात आली होती. ज्यात हजारो शिवभक्त हातात भगवा ध्वज घेऊन जयघोष करीत होते. शोभायात्रेच्या मार्गावर जागोजागी पुष्पवर्षा करण्यात येत होती. सकाळी ६ वाजता पालखी यात्रा काढण्यात आली. त्यानंतर अतिथींच्या उपस्थितीत महाराजांचे अभ्यंगस्नान करण्यात आले. १५१ महिलांतर्फे महाआरती करण्यात आली. या पालखी सोहळ्यादरम्यान मर्दानी आखाडातर्फे थरारक सादरीकरण करण्यात आले. यात लहान मुले व वृद्धांनीही
तलवारबाजीचे सादरीकरण केले. महालातील प्रत्येक चौकाला आकर्षक सजविण्यात आले होते. संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आला होता. शिवरायांची शौर्य प्रकट करणारी प्रतिकृती साकारण्यात आली होती. आकर्षक रांगोळीने रस्ते सजविण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून राजे मुधोजी भोसले, कान्होजी आंग्रेचे वंशज संभाजीराजे आंग्रे, जितेंद्रनाथ महाराज, जयसिंगराजे भोसले, सुमंतजी टेकाडे आदी उपस्थित होते. दत्ता शिर्के, जय आस्कर, विजय राजूरकर, आशिष खडके, विक्की उतखडे, चेतन भोसले, विशाल देवकर, पंकज वाघमारे, दिलीप दिवटे, महेश महाडिक, विवेक पोहाणे आदींचे सोहळ्यात सहकार्य लाभले.
५०० हुन अधिक वादक
या कार्यक्रमात २५ पथकांनी ढोलताशाद्वारे एकास्वरात महाराजांना मानवंदना दिली. ५०० हून अधिक वादकांनी वाद्य वाजवून राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात केली. सर्व कलावंत पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते.