शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जगासाठी आदर्श; डॉ. रमेश पांडव यांचे विधान
By जितेंद्र ढवळे | Updated: February 19, 2024 16:16 IST2024-02-19T16:13:59+5:302024-02-19T16:16:12+5:30
विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान.

शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जगासाठी आदर्श; डॉ. रमेश पांडव यांचे विधान
जितेंद्र ढवळे, नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना संपूर्ण जगासाठी आदर्श निर्माण करणारी असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील जीएमएनआयआरडीचे माजी संचालक डॉ. रमेश माधवराव पांडव यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी व्याख्यान पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे याप्रसंगी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन इस्लामी राज्यात जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा आदी गरजा पूर्ण होत नव्हत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांचा पोवाडा तसेच काही पत्रांचा आधार घेत सर्वसामान्य जनतेच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करावे लागले, असे डॉ. पांडव यांनी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोककल्याणकारी सुराज्य कसे निर्माण झाले याचा त्यांनी विविध पत्र तसेच समकालीन साहित्याचे दाखले देत उलगडा केला. आश्रयाला आले त्याचे कल्याण हाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुराज्याचा मध्यबिंदू होता, असे ते म्हणाले. ३५० वर्षं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला झाली आहेत. जगभरातील कल्याणकारी राज्याला छत्रपती शिवाजी महाराज आदर्श वाटतात, याचा खोलवर जाऊन अभ्यास करण्याची आवश्यकता पांडव यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याची संकल्पना स्पष्ट होती. त्यांच्या मातेने त्यांना महाभारत, रामायण ऐकविले होते. सर्व गोष्टींचा विचार करीत महाराजांनी मोठा पराक्रम केला. तत्कालीन सर्व चिंतकांची आपले राज्य व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक लोककल्याणकारी राजा म्हणून राज्याभिषेक झाला, असे ते म्हणाले. राज्याभिषेकानंतर शेतकरी आणि वंचित घटकांच्या योजनांचा त्यांनी प्रारंभ केला. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले.