उपराजधानीत शिवसेना अस्वस्थ, भाजप उत्साहात; गडकरी दिल्लीत, तुमाने मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 20:55 IST2022-06-21T20:54:21+5:302022-06-21T20:55:03+5:30
Nagpur News नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेनेचे असंतुष्ट आमदार सुरतला पोहोचल्याने शहरातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. तर, शहर शिवसेनेत अस्वस्थता पसरली.

उपराजधानीत शिवसेना अस्वस्थ, भाजप उत्साहात; गडकरी दिल्लीत, तुमाने मुंबईत
नागपूर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेनेचे असंतुष्ट आमदार सुरतला पोहोचल्याने शहरातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. तर, शहर शिवसेनेत अस्वस्थता पसरली. पक्षाचे नेते काहीही बोलण्यास टाळत आहेत. दुसरीकडे, बंडाची धार तीव्र झाल्याने भाजपने मंगळवारी विधान परिषदेतील विजयाचा जल्लोष अधिक जोमाने साजरा केला.
मंगळवारी सकाळी शिंदे यांच्या बंडखोरीचे वृत्त आल्यानंतर भाजपचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून मुंबईला रवाना झाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दिल्लीत बोलाविण्यात आले. योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले.
वाद संपवण्याचा प्रयत्न करीत आहे : जयस्वाल
रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते दोनदा शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. आताही शिवसेनेशी जवळीक कायम आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते अयोध्येलाही गेले होते. पक्षाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतात. अशा स्थितीत त्याच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला आपण उपस्थित राहिल्याचे जयस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिंदे यांची बंडखोरी शमवली जावी आणि पक्ष एकसंध राहावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटाशी सोबत असल्याचे वृत्त आहे.
आशिष देशमुख यांनी पटोले यांच्या राजीनाम्याची केली मागणी
बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसमधीलही असंतोष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याने माजी आमदार आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले की, चंद्रकांत हंडोरे हे दलित समाजाचे आहेत. त्यांना प्रथम क्रमांकाचे उमेदवार करण्यात आले. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्याच्या तपासासाठी ‘हायकमांड’ने चौकशी पथक पाठवावे. ते म्हणाले की, आमदारांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे.
भाजपचा जल्लोष
विधान परिषद निवडणुकीत ५ जागांवर विजय नोंदवल्यानंतर शहर भाजपने टिळक पुतळा चौकात जल्लोष केला. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटली. शहराध्यक्ष, आमदार प्रवीण दटके म्हणाले की, भाजपची इच्छा असेल तर अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोतही विजयी होऊ शकतात. मात्र, पक्षाने पाच जागांवर समाधान व्यक्त केले. आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, संजय अवचट, दीपराज पार्डीकर, नीता ठाकरे, अश्विनी जिचकार, बापू चिखले, बाल्या बोरकर, राम अंबुलकर, सुनील मित्रा, भोजराज डुंबे आदी उपस्थित होते.