शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 14:11 IST2025-12-10T14:08:26+5:302025-12-10T14:11:34+5:30
Junnar Shiv Sena Shinde Group MLA Sharad Sonawane: शिंदेंच्या आमदारांनी सरकारला पैसे फुकट न घालवता नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हेही स्पष्टपण सांगितले.

शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
Junnar Shiv Sena Shinde Group MLA Sharad Sonawane: जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यात ५५ लोक गेले. सरकार असे म्हणत आहे की, शेतकऱ्यांनी मानेला तारेचा पट्टा बांधून शेती केली पाहिजे. अंगणात मुले खेळत नाहीत. शाळेत जात नाहीत. मला असे वाटते की, अनेक उपाययोजना करण्यापेक्षा तीन महिन्यांच्या आत दोन हजार बिबटे राहतील, असे रेस्क्यू सेंटर बनवा. सरकारला हात जोडून विनंती आहे. नर आणि मादी यांच्यासाठी स्वतंत्र पिंजरे करा, जेणेकरून नसबंदीचा प्रश्न मिटेल. या सगळ्यांना सांभाळण्याचे पैसे देण्याचे वाइल्ड लाइफवाल्यांनी सांगितले आहे. त्यांच्यासाठी हॉस्पिटलही बांधले जाईल. हे अधिवेशन संपण्याच्या आधी शासनाने एक रेस्क्यू सेंटर जुन्नर तालुक्यात आणि एक अहिल्यानगर येथे बनवावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचे हल्ले राज्यभरात वाढलेले आहेत. याबाबत काही उपाययोजना करण्यासाठी सरकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. यातच महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्याचा वेष धारण केला आणि या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद सोनावणे म्हणाले की, आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावे लागेल. बिबट्यांना जेरबंद करावे लागेल. त्यांना बसल्या जागी खायला घाला. तुम्ही म्हणत आहात की शेळ्या सोडणार. परंतु, शेळ्या सोडून होणार नाही. कारण हे सगळे बिबटे जंगलात राहत नाही. उसाच्या शेतात किंवा आमच्या घराजवळ राहतात. मंत्र्यांना सल्ले देणाऱ्या सचिवांना माझी विनंती आहे की, आपण मुंबईत फ्लॅटमध्ये राहता. तुम्ही सुरक्षित असता. तुम्हाला ग्रामीण भागातील अवस्था माहिती नाही. तुम्हाला जनतेची अडचण माहिती नाही. तीन महिन्यांची, सहा महिन्यांची बाळं, महिला, शेतकरी यांच्यावर हल्ले होत आहेत. आता दिवसाही हल्ले होऊ लागले आहेत. बिबट्याचा विषय अतिशय भयंकर आहे. बिबट्यांच्या बाबतीत राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेऊन तत्काळ निर्णय जाहीर करावा, अशी मागणी सोनावणे यांनी केली.
मी मनापासून मायबाप सरकारला विनंती करतो की...
कोणत्याही परिस्थितीत बिबट्यांचा बंदोबस्त करायला हवा. यापुढे एकही बळी सर्व सामान्यांना मान्य नाही. एकही बळी गेला, तर याला सगळे जबाबदार असतील, सरकार जबाबदार असेल. बिबट्या हा शेड्यूल एकचा प्राणी नाही, तो शेड्यूल दोनमध्ये असायला हवा. मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. माणसे मरत आहेत. मी मनापासून मायबाप सरकारला विनंती करतो की, बाकी उपाययोजना करून सरकारचा पैसा घालवण्यापेक्षा माणूसच अशा हल्ल्यात दगावणार नाही, याची काळजी घ्या. शासनाच्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर करा, असे आमदार शरद सोनावणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वनखात्याकडे जमिनीची कमतरता नाही. मुबलक प्रमाणात जागा आहे. जुन्नर येथे जवळजवळ ४८ हेक्टर जागा आहे, तेथे एक हजार बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर बनवू शकता. कामाला सुरुवात करा. पुढील ९० दिवसांत एकही बिबट्या महाराष्ट्रात फिरणार नाही, याची दखल मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना घ्यावी लागेल, अशी आग्रहाची विनंती करतो, असे सोनावणे यांनी सांगितले. तसेच गेल्या २० वर्षांपासून आम्ही हा लढा लढत आहोत. २०१४ मध्येच मी सांगितले होते की, बिबट्यांची समस्या वाढणार आहे. तेव्हाही सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. सर्वसामान्य माणसाचे जीवन धोक्यात आले आहे. आमची शेती उजाड झालेली आहे. जीवाच्या भीतीने कोणताही शेतकरी काम करायला धजावत नाही, अशी परिस्थिती सोनावणे यांनी कथन केली.