शिव नाडर संघमंचावर येणार : संघाचा विजयादशमी उत्सव ८ ऑक्टोबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:06 IST2019-09-24T00:04:51+5:302019-09-24T00:06:14+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे ८ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याला ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शिव नाडर संघमंचावर येणार : संघाचा विजयादशमी उत्सव ८ ऑक्टोबरला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे ८ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याला ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७.४० पासून होणाऱ्या या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.
लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश, महाराष्ट्रासह दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला महत्त्व आले आहे. देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा पडणारा भार, पाकिस्तानकडून होणाऱ्या या कुरापती, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
स्वयंसेवकांमध्ये उत्साह
संघाच्या शाखांची वाढलेली संख्या, वाढता दबदबा आणि संघाच्या कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.