नवऱ्याने लवकर घरी यावे म्हणून धाक दाखवायला गेली आणि जीव गमावून बसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 03:21 PM2020-08-01T15:21:36+5:302020-08-01T15:23:15+5:30

रागाच्या भरात मुंग्या मारण्याचे घरातील कीटकनाशक शमशादने हाती घेतले आणि पतीला धाक दाखविण्यासाठी ते खाऊन घेतले.

She went to frighten her husband and lost her life | नवऱ्याने लवकर घरी यावे म्हणून धाक दाखवायला गेली आणि जीव गमावून बसली

नवऱ्याने लवकर घरी यावे म्हणून धाक दाखवायला गेली आणि जीव गमावून बसली

Next
ठळक मुद्देकळमन्यातील घटनेने हळहळ



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाहेरुन दारु पिऊन आलेल्या नवऱ्याला धाक दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला.
शमशाद एजाज शेख (वय २५) असे या दुर्देवी घटनेतील मृतक महिलेचे नाव आहे. ती कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी नगरात राहात होती. एजाज शेख यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सहा वर्षापूर्वी शमशादसोबत लग्न झाले होते. एजाज खाजगी नोकरीला आहे. कामाच्या निमित्ताने त्याला घरी पोहोचण्यासाठी मंगळवारी रात्री उशीर झाला. त्यात तो दारू पिऊन आल्याचे पाहून शमशादने एजाजसोबत वाद घातला.
रागाच्या भरात मुंग्या मारण्याचे घरातील कीटकनाशक शमशादने हाती घेतले आणि पतीला धाक दाखविण्यासाठी ते खाऊन घेतले. काही वेळानंतर शमशाद ओकाऱ्या करू लागली. विषाने अंमल दाखवल्याचे लक्षात येताच पहाटे २ च्या सुमारास एजाजने आजूबाजूच्यांना आणि तिच्या माहेरच्यांना माहिती देऊन लगेच तिला मेयो इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

माहिती कळताच कळमनाचे पोलीस उपनिरीक्षक दहिफळे आणि हवलदार नरेश रेवतकर यांनी मृत शमशादच्या माहेरच्यांना, सासरच्यांना तसेच आजूबाजूच्यांना विचारणा केली. शमशाद आणि एजाज या दोघांचा संसार सुखी होता. नवऱ्याने रोज लवकर घरी यावे यासाठी सहज धाक दाखवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे चौकशीतून उघड झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिमुकल्याचे हरविले मातृछत्र
या घटनेमुळे दोन निरागस जीवांचे मातृछत्र हरविले आहे. शमशादला एक पाच वर्षांचा आणि दुसरा सहा महिन्यांचा चिमुकला आहे. रागाच्या भरात शमशादने करून घेतलेल्या या आत्मघाती कृत्यामुळे हे दोन निरागस जीव आईच्या ममतेपासून कायमचे पोरके झाले आहे.

Web Title: She went to frighten her husband and lost her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.