त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘ती’ झाली सावली

By Admin | Updated: May 11, 2014 01:32 IST2014-05-11T01:32:01+5:302014-05-11T01:32:01+5:30

रस्त्यावर जगण्याचा संघर्ष करणार्‍या मुलांची प्रगती शिक्षणामध्ये आहे, हे त्या माऊलीने हेरले. गरीब वस्त्यांमध्ये जाऊन पालकांना समजाविले.

She was shadowed for her bright future | त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘ती’ झाली सावली

त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘ती’ झाली सावली

 सुमेध वाघमारे - नागपूर

रस्त्यावर जगण्याचा संघर्ष करणार्‍या मुलांची प्रगती शिक्षणामध्ये आहे, हे त्या माऊलीने हेरले. गरीब वस्त्यांमध्ये जाऊन पालकांना समजाविले. मुलांना एकत्र आणले. कधी चर्चच्या हॉलमधून, कधी झाडाच्या सावलीत, भाड्याच्या फ्लॅटमधून हा प्रवास सुरू झाला. मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून मुलांच्या दोन वेळच्या जेवण्याचा आणि राहण्याचा प्रश्नही सोडविला. मागील दहा वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू आहे. आई म्हणून प्रत्येक मुलांच्या उज्ज्वल भविष्याची ती स्वप्न बघते आहे. तोच त्यांच्या जीवनाचा ध्यासही आहे. ८० वर्षीय आयरिस विल्किन्सन त्या माऊलीचे नाव. झाडाखालील या शाळेला आज स्वत:ची इमारत आहे. नवजीवन संस्थेंतर्गत गोधनी येथील टी.एस. विल्किन्सन नावाने ही शाळा दानदात्यांच्या मदतीने सुरू आहे. येथील शिक्षकही या सामाजिक कार्याचा एक भाग आहेत. आयरिस विल्किन्सनसारखेच तेही मुलांच्या भविष्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी झुंज देत आहेत. मुलांच्या वाटेतील अंधार दूर करण्याचा त्यांचा हा संघर्ष आहे. त्यांनाही स्वत:ची चिंता नाही, चिंता आहे फक्त या गरीब मुलांच्या शिक्षणाची. आयरिस विल्किन्सन या एका खासगी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामाला होत्या. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, तिथे सर्वच श्रीमंतांच्या घरची मुले होती. त्यांना शिकविताना खिडकीतून बाहेर उन्हातान्हात रस्त्यावर फिरणारी, खेळणारी गरिबांची मुले दिसायची. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे, असे नेहमीच वाटायचे. परंतु परिस्थिती नव्हती. कुटुंबाची जबाबदारीही माझ्यावरच होती. २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने अशा मुलांना गोळा करू लागले. गरीब वसाहतीत जाऊन त्यांच्या पालकांना शिक्षणाविषयी माहिती देऊ लागले. साधारण १५-२० मुले शिक्षणासाठी तयार झाली. सदरमधील एका चर्चच्या अधिकार्‍याला विनंती केली. त्यांनी या मुलांना शिकविण्यासाठी हॉल दिला. परंतु महिनाभरातच हा हॉल रिकामा करून द्यावा लागला; नंतर झाडाच्या सावलीत शाळा सुरू झाली. ऊन-वार्‍यामुळे येथे शिकविणे कठीण झाले होते, म्हणून बैरामजी टाऊन येथील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला. मुले चार भिंतीत शिकायला आली. याची माहिती एका विदेशी महिलेला मिळाली. तिने गोधनी येथे जागा विकत घेऊन थोडेफार बांधकाम करून दिले. नवजीवन संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या अंतर्गत शाळा सुरू झाली. नेहमी प्रेरणा देणारे माझे मिस्टर टी. एस. विलकिन्सन त्यांचेच नाव या शाळेला दिले. शाळा सुरू तर केली, पण मुलांच्या गैरहजरीचे प्रमाण मोठे होते. त्यामागे मुलांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न होता. म्हणून समाजातील दानदात्यांकडे गेली. काहींनी मदत केली. त्या मदतीमुळेच मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देता आली. शाळेत आजच्या घडीला २५० विद्यार्थी आहेत. भिकारी, रिक्षेवाले, कचरा वेचणार्‍यांची ही सर्वच मुले हुशार आहेत. त्यांना चांगल्यात चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आमच्या प्रयत्न आहे. हे समाजकार्य नाही. माझी, सर्वांची जबाबदारी आहे. ज्या समाजाने मला मोठे केले, शिकवले, माझी काळजी घेतली आणि खूप आशा जागृत केल्या, त्या समाजाचे ऋण मी एक आई म्हणून फेडत आहे.’

Web Title: She was shadowed for her bright future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.