-अन् त्याच फुलांनी तिचा सत्कार झाला!
By Admin | Updated: June 19, 2014 01:00 IST2014-06-19T01:00:49+5:302014-06-19T01:00:49+5:30
ती घरातली मोठी मुलगी. लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. काय करावे काहीच सुचेना. आजूबाजूला फुलांचे दुकान नव्हते. फुलासारख्या या मुलीने फुले विकण्याचा निर्णय घेतला.

-अन् त्याच फुलांनी तिचा सत्कार झाला!
नेहा मौंदेकर : फुले विकताना मिळविले यश
नागपूर : ती घरातली मोठी मुलगी. लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. काय करावे काहीच सुचेना. आजूबाजूला फुलांचे दुकान नव्हते. फुलासारख्या या मुलीने फुले विकण्याचा निर्णय घेतला. लोकांना ही गरजेची बाब होतीच. हळूहळू या फुलांनीच तिला सावरले. फुले विक्रीतून आलेल्या पैशांवर घर चालवायचे आणि थोडासा पैसा शिक्षणासाठी खर्च करायचा. जिद्द होतीच आणि त्याला परिश्रमाचीही जोड. दहावीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू होता. फुलांचे हार करताना अभ्यासाचाही एक-एक मुद्दा ती डोक्यात माळत राहिली. ती आता महापालिकेच्या शाळेतून प्रथम आली आहे. नेहा मौंदेकरला या यशाचे समाधान आहे.
सोयी, सुविधा मिळाल्यावर फक्त अभ्यास करणे आणि गुणवत्तेत येणे हे फार मोठे आव्हान नाही. पण परिस्थितीला शरण न जाता जिद्दीने यशाकडे झेपावणे कठीण असते. त्यासाठी निग्रह लागतो. प्रबळ इच्छाशक्ती लागते. नेहाने या भरवशावरच यशाची माळ गळ्यात घातली. ज्या फुलांचे हार तयार करून ती विकते, त्या फुलांनीच आज तिच्या सत्काराने कृतकृत्यता मानली. मानेवाडा बेसा रोडवर एका छोट्याशा दुकानात ती फुलांची विक्री करते. पूर्वी हा व्यवसाय तिचे वडील करायचे. पण अचानक ते आजारी पडले. वडिलांच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. उपचारासाठी पैसे नाहीत आणि कुणी मदतीला नाही. कुटुंबावर आघात झाला. वडिलांना काम करू द्यायचे नाही अन्यथा त्यांना धोका होऊ शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितले. यावर उपाय काढणे गरजेचे होते. मोठी मुलगी म्हणून हा व्यवसाय करण्याची जबाबदारी नेहाने स्वीकारली. आई घर सांभाळते आणि नेहा व्यवसाय. दिवसाला मिळणाऱ्या पैशांमधून कसेबसे घर चालते. पुस्तके आणि गणवेश महापालिकेच्या शाळेतूनच मिळतो. इतर खर्च मात्र करावा लागतो. वडिलांच्या उपचारासाठी पैसे नाहीत पण हे आव्हानही स्वीकारायचे आहे. यात लहान भावाचीही जबाबदारी तिच्यावर आहे. शिक्षक असलेल्या मामांनी मदत केली. त्याप्रमाणेच मुख्याध्यापिका वैशाली चेडे यांच्या सहकार्याने हे यश मिळविता आले, असे ती म्हणाली. तिच्या या यशाने तिच्या आईवडिलांना समाधान लाभले. यापुढे अभियंता होण्याची इच्छा असलेल्या नेहाने त्यासाठी सर्व परिश्रमाची तयारी ठेवली आहे.