राजेश शेगोकारनागपूर : सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मातामृत्यू प्रकरण गाजत असतानाच, विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांतही अशाच दोन वेदनादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत एक समान धागा आहे, तो म्हणजे आरोग्य व्यवस्थेची बेफिकिरी आणि हलगर्जी.
पहिला घटना आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या प्रतिभा मुकेश उके (३०) यांची. प्रतिभा १० एप्रिल रोजी प्रसूतीसाठी दाखल झाल्या. २४ तास प्रयत्न करूनही सामान्य प्रसूती न झाल्याने, त्यांना दुसऱ्या दिवशी गोंदियातील गंगाबाई स्त्री रुग्णालयात हलवण्यात आले. १२ एप्रिलच्या रात्री २ वाजता प्रतिभाने सामान्य प्रसूतीत बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर तीव्र रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. प्रकृती बिघडल्यामुळे सकाळी केटीएस रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवस उपचार सुरू राहिले; पण १५ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पती मुकेश उके यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. दुसरी घटना गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याच्या विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत घडली.
मनीषा धुर्वे (वय ३१) ही आदिवासी माता मध्यरात्री विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल झाली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सकाळपर्यंत प्रसूती होईल, असे सांगितले. सकाळ झाली; पण प्रसूती झाली नाही. नातेवाइकांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली. मात्र थांबण्याचा सल्ला देण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत प्रसववेदना तीव्र झाल्या; पण स्थिती सुधारली नाही. नंतर मात्र त्यांना तातडीने देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी ब्रह्मपुरीला रेफर करण्यास सांगितले; पण तेव्हाच मनीषा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. या दोन्ही घटना अपघात नाही, तर आरोग्य व्यवस्थेचे अपयश आहे. गडचिरोलीसह पूर्व विदर्भात अशा घटनांमध्ये सातत्य आहे. ग्रामीण भागात पोहोचलेल्या आरोग्य व्यवस्थेला अधिक जबाबदार करण्याची गरज यामधून अधोरेखित होते. अनेक आरोग्य केंद्रांत प्राथमिक उपचारही होत नाहीत; तसेच रुग्णाला योग्य सल्लाही दिला जात नाही. वेळेवर निर्णय न घेणे, अपुरा उपचार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची बेफिकिरी यांमधून झालेला मातृत्वाचा कडवट शेवट या घटनांमधून अधोरेखित झाला आहे. आता या दोन्ही प्रकरणांत दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यशावकाश त्यामधून सत्य बाहेर येईल अन् आरोग्य व्यवस्थेला धडाही मिळेल; पण जीव गमावलेली माता परत येणार नाही.