शरद पवारांचा विदर्भातील ओबीसींवर फोकस; राज्यस्तरीय शिबिर ३ व ४ जून रोजी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 22:21 IST2023-05-30T22:21:11+5:302023-05-30T22:21:44+5:30
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय शिबिर ३ व ४ जून रोजी नागपुरात होत आहे. या शिबिराच्या समारोपाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांचा विदर्भातील ओबीसींवर फोकस; राज्यस्तरीय शिबिर ३ व ४ जून रोजी नागपुरात
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील आपली पकड मजबूत करण्यासाठी ओबीसींवर फोकस केला आहे. पक्षाच्या ओबीसी सेलवर जबाबदारी सोपवत जास्तीत जास्त ओबीसी नेते व कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय शिबिर ३ व ४ जून रोजी नागपुरात होत आहे. या शिबिराच्या समारोपाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीने एवढी वर्षे ताकद लावूनही विदर्भात अपेक्षित यश मिळालेले नाही. विदर्भातील पाय रोवायचे असतील तर येथील ओबीसी मतदारांना आपल्याकडे वळविल्याशिवाय पर्याय नाही, हे राष्ट्रवादीला कळून चुकले आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून ओबीसींच्या आंदोलनाला पाठबळ दिले जात असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ हे या चळवळीचे नेतृत्व करताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या शिबिराचे ३ जून रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल, तर ४ जून रोजी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, नूतन रेवतकर आदी उपस्थित होते.
ओबीसी प्रश्नांवर मंथन
- या शिबिरात ओबीसींच्या विविध प्रश्नांवर मंथन होईल. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा. हरी नरके, आ. अमोल मिटकरी, ॲड. अंजली साळवे, सक्षणा सलगर, विकास लवांडे, अविनाश काकडे आदी मार्गदर्शन करतील.