आज शरद पवार नागपुरात : राजकीय वर्तुळाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:15 IST2019-11-14T00:14:08+5:302019-11-14T00:15:54+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात येत असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले आहे.

आज शरद पवार नागपुरात : राजकीय वर्तुळाचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानाची ते पाहणी करणार आहेत. राज्यात सद्यस्थितीत राष्ट्रपती शासन लागले असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात येत असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सकाळी ९.५५ वाजता शरद पवार नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते काटोलमधील पीक नुकसानाची पाहणी करतील. सायंकाळी ते नागपुरात परततील व रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम करतील. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांची पत्रपरिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ते बिरसा जयंती आदिवासी अधिकार व शिक्षा परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. रात्री ८.४५ वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.