नागपुरात राममंदिरासाठीच्या ‘हुंकार’चा शंखनाद महाआरतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:23 IST2018-11-17T21:20:33+5:302018-11-17T21:23:43+5:30
अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरू तसेच नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हुंकार सभेचा शंखनाद शनिवारी नागपुरात दोन ठिकाणी महाआरतीच्या माध्यमातून करण्यात आला.

नागपुरात राममंदिरासाठीच्या ‘हुंकार’चा शंखनाद महाआरतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरू तसेच नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हुंकार सभेचा शंखनाद शनिवारी नागपुरात दोन ठिकाणी महाआरतीच्या माध्यमातून करण्यात आला.
राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी अयोध्या, बंगळुरू व नागपुरात हुंकार सभा होणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हनुमान नगर येथील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ही सभा होणार आहे. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने येथून देशात संदेश जाणार आहे. संघभूमीत होणाऱ्या सभेसाठी नागपूरसह सहा लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते येणार आहेत. विशेष म्हणजे भाजप आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संघ परिवारातील विविध संघटना कामाला लागल्या आहेत.
या सभेबाबत वातावरणनिर्मिती करण्यासाठी तसेच संकल्प घेण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पोद्दारेश्वर राममंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या या महाआरतीला अभाविपसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. तर सायंकाळी ६ वाजता भारतीय जनता युवा मोर्च्यातर्फे रामनगर येथील हनुमान मंदिरातदेखील महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळीदेखील संघ परिवारातील विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रविवारी आमदारांची बैठक
दरम्यान, या सभेसाठी भाजपालादेखील विशेष ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या सभेला कमीत कमी १ लाख लोक यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात आमदारांची बैठक १८ नोव्हेंबर रोजी रेशीमबाग स्थित हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात होणार आहे. या बैठकीला शहरासोबतच जिल्हा तसेच प्रांतातील आमदार अपेक्षित आहेत. या बैठकीत सभेचे नियोजन, व्यवस्था त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची व्यवस्था इत्यादीसंदर्भात सखोल चर्चा होईल.