शंभूराजांच्या बलिदानाने मराठ्यांची शक्ती दुप्पट केली
By Admin | Updated: November 8, 2015 03:10 IST2015-11-08T03:10:33+5:302015-11-08T03:10:33+5:30
शंभूराजांच्या पराक्रमाचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. पण शंभूराजांवर म्हणावे तसे इतिहासकारांनी अद्यापही लिहिलेले नाही.

शंभूराजांच्या बलिदानाने मराठ्यांची शक्ती दुप्पट केली
नागपूर : शंभूराजांच्या पराक्रमाचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. पण शंभूराजांवर म्हणावे तसे इतिहासकारांनी अद्यापही लिहिलेले नाही. बखरींच्या आधारावर आलेला इतिहास अनेकदा दिशाभूल करणाराही असू शकतो. शंभूराजांच्या संदर्भातील इंग्रजांनी आणि मोगलांनी केलेल्या नोंदी आणि कागदपत्रे तपासली तर शंभूराजांच्या शौर्यगाथेचा इतिहास अभिमानाने मान उंच करायला भाग पाडतो. पण शंभूराजांच्या संदर्भात बरेच गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. शंभूराजांनी मोगल साम्राज्याला सातत्याने मात दिली आणि स्वराज्याचा विस्तार केला. पण फितुरीमुळे औरंगजेबाने त्यांना पकडले आणि त्यांची निघृण हत्या केली. शंभुराजांचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यानंतर मराठ्यांनी दुप्पट जोमाने औरंगजेबाची कबर खोदली आणि दिल्लीचे तख्तही पलटवले, असे मत शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज यांनी केले.
रोटरी क्लब आॅफ नागपूर वेस्ट आणि नवनिर्माण को. आॅप. हाऊसिंग सोसायटीच्यावतीने रोटरी बालोद्यान, हनुमान मंदिर येथे त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘राजा शंभू छत्रपती’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शंभूराजांना पूर्ण करायचे होते. शिवाजींचे निधन झाले तेव्हा अखेरचे दर्शनही शंभूराजांना घेता आले नाही. शिवाजींच्या निधनाची बातमी सोयराबार्इंनी दडवून ठेवली कारण त्यांना रामराजांना राज्याभिषेक करायचा होता. शंभूराजांनी जनतेच्या आणि सैन्याच्या मदतीने स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला आणि शिवाजींचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला. त्याचवेळी औरंगजेबाच्या मुलाला जोधपूरच्या दुर्गादास राठोड यांनी फोडले आणि अकबर राठोड यांच्यासोबत आला. जोधपूर आणि चित्तोडचे राज्य औरंगजेबाविरुद्ध एकत्र आले. पण औरंगजेबाच्या धूर्ततेमुळे ही लढाई राजपूत जिंकू शकले नाहीत.
शंभूराजांनी अकबर आणि राठोड यांना मदत केली. शंभूराजांची विजयी घौडदौड सुरू होती आणि देशात स्वराज्य निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प सिद्धीस जाण्याची चिन्हे असताना त्यांचे विश्वासू सेनापती हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू झाला. त्यात गणोेजी शिर्के, रामसेजचा किल्लेदार यांनी फितुरी केल्याने शंभूराजे औरंगजेबच्या कोंडीत सापडले. कर्नाटकची रसद बंद झाली. औरंगजेबाने शंभूराजांचे कुऱ्हाडीने तुकडे करून त्यांना मारले आणि भाल्याच्या टोकावर त्यांचे शिर ठेवून मिरवणूक काढली. शंभूराजांच्या या बलिदानाने मराठ्यांचे रक्त तापले आणि त्यांनी औरंगजेबाची कबर खोदायचीच हा निर्धार केला. पुढे तसे झालेही आणि दिल्लीपर्यंत मराठ्यांनी सत्ता काबीज केली. यामागे शंभूराजांनी निर्माण केलेल्या कार्याचा, संपर्काचा आणि मैत्रीचा मोठा हात होता. शंभूराजे स्वत: स्वराज्य निर्माण करू शकले नसले तरी त्यांची प्रेरणा महत्त्वाची होती. हा इतिहास मांडण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विजयराव देशमुख यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन प्रफुल्ल माटेगावकर, आभार सुमुख नातू यांनी मानले. (प्रतिनिधी)